घुग्घूस नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विकासकामांवरून जोरदार खडाजंगी
विरोधी गटनेते मीणा मोरपका व गणेश पिंपळकर यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

चांदा ब्लास्ट
घुग्घूस/चंद्रपूर : घुग्घूस नगर परिषदेची सर्वसाधारण सभा दि. २९ जून २०२६ रोजी नगर परिषद सभागृहात पार पडली. सभेत शहरातील विकासकामे, स्वच्छता, पाणीपुरवठा, वीज व्यवस्था, अग्निशमन सेवा, बांधकामे, सौरऊर्जा, भूमिगत गटारे, पाण्याच्या टाक्या, नवीन पाणी टँकर खरेदी, विकास आराखडा, घनकचरा व्यवस्थापन आदींसह एकूण २३ विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सभेच्या प्रारंभी मागील सभेच्या इतिवृत्तास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर स्वच्छ सर्वेक्षण २.०, माझी वसुंधरा अभियान, सेप्टिक टँक साफसफाई वाहनांचे दर निश्चिती, फॉगिंग मशीनसाठी डिझेल-पेट्रोल खरेदी, नगर परिषदेच्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविणे, नगर परिषदेच्या पॅनेलवर विधिज्ञांची नियुक्ती, अग्निशमन दलाच्या वाहनाची दुरुस्ती तसेच इतर प्रशासकीय विषयांवर चर्चा करण्यात आली.
सभेच्या दुसऱ्या टप्प्यात एसडब्ल्यूएम सेंटर व यूडब्ल्यूएम साईट येथे २० केव्ही सौर रूफटॉप प्रकल्प उभारणे, वीज विभागाच्या निविदेची मुदतवाढ, हिंदू स्मशानभूमीत ५० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारणे, बेलोरा घाट येथे ३० एचपी क्षमतेचा पंप खरेदी, नवीन पाणी टँकर, डीआय पाइपलाइन, अल्ट्रासोनिक फ्लोमीटर, नगर विकास आराखडा तयार करणे, शहरातील मुख्य रस्त्यात बदल, धोकादायक व जीर्ण इमारतींवर कारवाई तसेच विविध शासकीय योजनांशी संबंधित प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली.
सभेदरम्यान विरोधी गटनेते मीणा मोरपका आणि नगरसेवक गणेश पिंपळकर यांनी नगर परिषद प्रशासन व सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. शहरातील तुंबलेल्या नाल्या, अपूर्ण विकासकामे, पाणीपुरवठ्यातील अडचणी, स्वच्छता व्यवस्थेतील त्रुटी तसेच मंजूर योजनांच्या अंमलबजावणीत होत असलेल्या विलंबावर त्यांनी तीव्र आक्षेप घेतले. अनेक महत्त्वाची कामे केवळ प्रस्तावांपुरतीच मर्यादित राहिली असून नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला.
विकासकामांमध्ये पारदर्शकता आणावी, रखडलेले प्रकल्प निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावेत तसेच नागरिकांच्या दैनंदिन समस्यांना प्राधान्य देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विरोधी सदस्यांनी केली.
सभेच्या अखेरीस विविध विषयांवरील प्रस्तावांवर आवश्यक निर्णय घेण्यात आले. अध्यक्षांच्या परवानगीने अन्य विषयांवरही चर्चा करण्यात आली. मात्र, सभेत उपस्थित संबंधित कंपनीचे प्रतिनिधी किंवा नगर परिषद प्रशासनाकडून विरोधकांनी केलेल्या आरोपांवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.


