ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना तालुक्यात एस.आय.आर. प्रक्रियेला वेग; बीएलओंवर प्रचंड ताण

शिक्षक बीएलओ मानसिक दबावात — कागदपत्रांची अडचण, नोटिसांनी वाढला ताण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

कोरपना :_ तालुक्यात सध्या सुरू असलेल्या एस.आय.आर. (Special Intensive Revision) प्रक्रियेमुळे बीएलओ (Booth Level Officer) म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. मतदार यादी अद्ययावत करण्याच्या या मोहिमेत अनेक अडचणी समोर येत असून, त्यामुळे बीएलओंमध्ये तीव्र नाराजी आणि मानसिक दबावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेषतः ग्रामीण भागात काम करणाऱ्या बीएलओंना कागदपत्रांची पडताळणी करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक प्रकरणांमध्ये महिलांच्या नोंदींसाठी “सुनांचे वडिलांचे नाव” शोधण्याचा प्रश्न निर्माण होत असून, ही माहिती उपलब्ध करणे अत्यंत कठीण ठरत आहे. तसेच, 2002 सालच्या जुन्या मतदार यादींची आवश्यकता भासत असली तरी त्या नोंदी स्थानिक तहसील स्तरावर उपलब्ध नसल्याने बीएलओंना ती कागदपत्रे नेमकी कुठून आणायची, असा प्रश्न पडला आहे.

याशिवाय, कामाची मुदत आणि टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने दबाव टाकला जात असल्याचेही समोर येत आहे. ज्या बीएलओंचे काम ‘यलो लाईन’मध्ये (अपुऱ्या प्रगतीत) आहे, त्यांना जिल्हाधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याबाबत सूचना किंवा मेसेज देण्यात येत असल्याने ताण आणखी वाढला आहे. परिणामी, “काम कसे पूर्ण करायचे?” हा प्रश्न अनेक बीएलओंसमोर उभा ठाकला आहे.

शिक्षक म्हणून नियमित शालेय जबाबदाऱ्या सांभाळताना त्याचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रशासनिक काम करण्याची वेळ आल्याने अनेक जण मानसिक तणावाखाली काम करत असल्याचे चित्र आहे. काही बीएलओंनी या परिस्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून, अशा दबावामुळे गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने एस.आय.आर. प्रक्रियेत सुलभता आणावी, कागदपत्रांची उपलब्धता सुनिश्चित करावी आणि बीएलओंवरील अनावश्यक दबाव कमी करावा, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा, या वाढत्या तणावामुळे एखादी गंभीर घटना घडल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एकंदरीत, मतदार यादी शुद्धीकरणाची महत्त्वाची प्रक्रिया असली तरी ती राबविताना तळागाळातील कर्मचाऱ्यांच्या अडचणी लक्षात घेणे तितकेच आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये