ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथे हिंदू संमेलन संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा अशोक डोईफोडे

 सकल हिंदू समाजातर्फे देऊळगाव राजा येथील शिवाजी वस्ती मध्ये श्री पंचमुखी हनुमान मंदिर या ठिकाणी भव्य असे विशाल हिंदू संमेलन 15 मार्च रोजी संपन्न झाले. या हिंदू संमेलनासाठी संत श्री नरहरीनाथ संस्थान देऊळगाव राजा येथील हरिभक्त परायण श्री उदबोध महाराज पैठणकर तथापि मातृशक्ती म्हणून महिला समन्वय विभागाच्या संयोजिका सौ पद्मजा अहिर आणि प्रांताचे घोष प्रमुख माननीय श्री श्रीनिवासजी बेडेकर हे प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होते. हिंदू संमेलनाचे संपूर्ण संयोजन सेवानिवृत्त प्राध्यापक प्रदीपजी मिनासे यांनी केले तर शिवाजी वस्तीतील सकल हिंदू समाजाने याच्या आयोजनासाठी अथक परिश्रम घेतले.*_

 संमेलनाच्या सुरुवातीला तीन वर्षाच्या बालकाने प्रभू श्रीरामचंद्र रूपात मंचावर संगीतमय आगमन केले, त्यावेळी जमलेल्या सर्व हिंदू बांधव भगिनींनी अत्यंत उल्हासित होऊन प्रभुरामचंद्रावर पुष्पवृष्टी केली. हिंदू संमेलनाच्या सुरुवातीस प्रभू रामचंद्राच्या आगमनानंतर कार्यक्रमाचा प्रारंभ गोमाता पूजनाणे झाला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व भारत माता पूजन झाले शिवरायांना मानवंदना देताना तुळजापूर येथील भजनी मंडळाने सादर केलेली विविध शिवगीते ही सुद्धा या संमेलनाच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू होती.

 संमेलनामध्ये सर्वप्रथम देऊळगाव राजा येथील संत नरहरीनाथ संस्थानचे हरिभक्त परायण श्री उद् बोध महाराज पैठणकर यांनी आपले आशीर्वचनांमध्ये हिंदू बांधवांना आपल्या सुरेल मधुर वाणीतून भारतीय संस्कृतीचे प्रत्यक्ष अक्षरदर्शन करून दिले. हिंदू बांधवांना आवाहन करताना गौ, गंगा, गायत्री आणि ग्रंथ यांचा सन्मान केला पाहिजे, त्यासाठी सातत्याने त्यांच चिंतन, मनन, आणि पूजन करण्याचे आवाहन केले. आपली भारतीय संस्कृती आपल्या भारतीय परंपरा यांचा अवलंब करण्यासंबंधी संवाद साधला. संघ शताब्दी निमित्ताने हे हिंदू संमेलन होत आहे, तेवढ्यावरच फक्त न थांबता भारतातील सकल हिंदूंनी नेहमीच एकत्र राहण्यासाठी आपण अशा प्रकारची संमेलने वारंवार घेतली पाहिजे, असे विचार व्यक्त केले. भारताच्या प्रगतीसाठी भारताच्या उन्नतीसाठी सकल बांधवांनी पुरेपूर प्रयत्न केले पाहिजे. आपले अधिकार आणि आपले कर्तव्य यासोबतच आपली राष्ट्रीय भावना ही नेहमी जागृत ठेवून राष्ट्राच्या संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी सर्व नागरिकांनी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन केले.

 जीवनामध्ये उत्तमोत्तम मार्ग स्वीकारून समाजाच्या उन्नतीचा विचार मनी बाळगावा, आपण हिंदू म्हणून आपली ओळख कदापिही विसरता कामा नये, त्यासाठी पुरुषांनी कपाळावर गंध लावावे, पारंपरिक धोतर हा वेष रोज जरी नाही जमले तरीही सणावारांच्या दिवशी परिधान करावा आणि संस्कृतीची जोपासना करावी, तरच आपली हिंदू संस्कृती अबाधित राहील आणि आपली ओळख जगाला पटेल असे विचार व्यक्त केले.

 त्यानंतर महिला वक्त्या सौ पद्मजा अहिर यांनी नारी सुरक्षा या विषयावर उपस्थितांना समयोचित मार्गदर्शन केले व आवाहन करताना आपल्या मार्गदर्शनातून संपूर्ण महिलांची मने जिंकली. कुटुंबामध्ये संस्काराचे माहेरघर म्हणजे स्त्रिया असून स्त्रियांकडूनच कुटुंबामध्ये मुलामुलींना संस्कार मिळत असतात. म्हणून मुलामुलींच्या संस्काराकडे स्त्रियांनी आजच्या आधुनिक युगातही लक्ष देणे किती गरजेचे आहे, याचे महत्त्व त्यांनी विशद केले. आजकाल मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत विदिर्ण झालेला असून मुलींना बालपणीच त्यांच्या सुरक्षा, निकोप स्पर्श आणि नकोसा स्पर्श हा कसा ओळखावा, याबद्दलही विस्तृत मार्गदर्शन केले. त्यांनी बालिकांनाही विशेष असे आवाहन करताना स्त्रिया आणि मुलीचा वेश, कपाळावर गंध असणे, भारतीय परंपरांची जपणूक करणे, एक स्त्री म्हणून जगासमोर अत्यंत पूरक सांस्कृतिक वेषात उपस्थिती दर्शवणे, समाजाच्या दृष्टीने निकोप असे वर्तन करणे, याबद्दल मार्गदर्शन केले.

 रा.स्व.संघाचे प्रांत घोष प्रमुख श्रीनिवास बेडेकर यांनी संघ शताब्दीच्या निमित्ताने संघाचा शंभर वर्षाचा प्रवास किती खडतर आहे हे उदाहरणादाखल सांगितले. संघाचा हा संपूर्ण प्रवास करताना संघाला कोणकोणत्या अग्निदिव्यातून पुढे जावे लागले याचाही आलेख त्यांनी या ठिकाणी उपस्थितांसमोर मांडला. उपस्थितांना त्यांनी आपले हिंदुराष्ट्र टिकले पाहिजे, त्याचे अस्तित्व टिकण्यासोबतच प्रगती ही साधली गेली पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी एकजूट राहणे, एकत्र येणे किती गरजेचे आहे हे आवर्जून सांगितले. सोबतच त्यांनी सांघिक पद्धती, शाखेमध्ये चालणारे उपक्रम, ज्यायोगे स्वयंसेवकांचे मन शरीर यांची जडणघडण कशी केली जाते ,याची कार्यपद्धती समजावून दिली. संघाच्या शाखेमध्ये खेळ, दंड, योग, प्राणायाम, अनुशासन ह्यामधून व्यक्ती निर्माण कसे होत आहे, हे त्यांनी आपल्या अमूल्य विचारातून प्रगट केले.

सकल हिंदू समाज छत्रपती श्री शिवाजी महाराज वस्तीच्या आयोजन समितीने व हिंदू बंधू भगिनींनी स्वयंस्फूर्तीने परिश्रम घेऊन हे हिंदू संमेलन यशस्वी केले.हिंदू संमेलनाच्या निमित्ताने असंख्य माता-भगिनी आणि पुरुष, बालक व बालिकाची प्रचंड उपस्थिती होती.

संमेलनाच्या शेवटी भारत मातेच्या आरतीद्वारे हिंदूभुमी चिरकाल अबाधित राहण्यासोबतच सशक्त व्यक्तीनिर्माणाची निःस्पृह कामना करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुनील धोंडारकर यांनी केले. उपस्थित सर्वांसाठी पर्यावरण पूरक पात्रामध्ये राम खिचडी प्रसाद वितरण करण्यात आले, आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये