शून्य संच मान्यतेच्या एक शिक्षकी शाळा बंद केल्यास समता सैनिक दलाचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : सत्र 2025-26 च्या संच मान्यतेनुसार शून्य संच मान्यता असलेल्या एकच शिक्षक असलेल्या अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन झाल्यास शाळा बंद होईल परिणामी खेड्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल. जर शासन खेड्यातील विद्यार्थी पालकांच्या जीवनाशी खेळत असेल तर समता सैनिक दल राज्यव्यापी आंदोलन करेल असा इशारा ऑल इंडिया समता सैनिक दलाचे विदर्भ सचिव रमेश निमसडकर व रिपाई चे विदर्भ अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, व शिक्षण मंत्री नामदार दादाजी घुसे यांना शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद वर्धा यांचे मार्फत निवेदनातून दिला आहे.
भारतीय घटनेनुसार 14 वर्षाखालील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे अनिवार्य आहे .असे असताना 15 मार्च 2024 चा संच मान्यतेचा शासन जी आर हा घटनेचा अवमान करणारा असून विद्यार्थ्यांच्या हिता विरुद्ध आहे. अशा परिस्थितीत शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी शून्य संच मान्यता असलेल्या शाळेत एकच शिक्षक कार्यरत असेल तर त्या शिक्षकाचे समायोजन करू नये यावर काहीतरी तोडगा काढावा व शून्य संच मान्यता एक शिक्षक असलेल्या शाळा बंद केल्यास, विद्यार्थी व पालकांच्या समस्या वाढेल. आर्थिक परिस्थितीमुळे खेड्यातील पालक बाहेरगावी मुलांना शिक्षणासाठी पाठवू शकत नाही.
कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास व कोणत्याही परिस्थितीत खेड्यातील शाळा बंद केल्यास ऑल इंडिया समता सैनिक दल विद्यार्थी पालकांना घेऊन महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन करेल. निवेदन देतेवेळी विदर्भ सचिव रमेश निमसडकर, रिपाई विदर्भ अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर, पद्माकर कांबळे ,दिलीप वैद्य उपस्थित होते.



