मानवी सुरकर हिची क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी
कराटे स्पर्धेत गोल्ड मेडल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभुर्णा : पोभुर्णा तालुक्यातील जुनगाव येथील शेतकरी घनश्याम केशव सुरकर यांची कन्या मानवी घनश्याम सुरकर हिने शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करत कराटे स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावले आहे.
राजुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात शिक्षण घेत असताना मानवीने कराटे स्पर्धेत हिरीरीने सहभाग घेत उत्कृष्ट कामगिरी करत गोल्ड मेडल मिळविण्याचा मान मिळवला. तिच्या या यशामुळे शाळा आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मानवी ही केवळ कराटेपुरती मर्यादित नसून शालेय जीवनात कबड्डी, सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य स्पर्धा, सुगम संगीत, वक्तृत्व तसेच विविध कला-कौशल्य स्पर्धांमध्येही सक्रिय सहभाग घेत आपल्या अंगी असलेल्या सुप्त गुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन करत आहे.
तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेच्या वतीने मुख्याध्यापकांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातील मुलींमध्येही कला व क्रीडा कौशल्याचा मोठा साठा असल्याचे मानवीच्या यशातून पुन्हा अधोरेखित झाले आहे.
तिच्या या यशाबद्दल परिसरातून तिचे अभिनंदन व कौतुक केले जात असून, या यशाचे श्रेय तिने मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच वडील घनश्याम सुरकर आणि आई शेवंताताई सुरकर यांना दिले आहे.



