जिवतीत ७/१२ वरील नावे कमी करण्यावर कास्तकारांचा आक्षेप ; जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन
पट्टे वाटप १९९०–९२ पर्यंत; तरीही तरुणांच्या नावावर ७/१२ वैध कसे, निवेदनातून प्रश्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- तालुक्यातील कास्तकारांच्या ७/१२ उताऱ्यावर असलेली नावे कमी करण्यासंदर्भात तहसील कार्यालयाकडून दिल्या जात असलेल्या पत्रांवर कास्तकारांनी तीव्र आक्षेप नोंदविला आहे. केवळ फेरफार पंजीलाच आधार मानून कारवाई केली जात असल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कारवाईला तात्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात काँग्रेसचे तालुका सचिव देविदास अर्जुन साबणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले.
निवेदनानुसार, १९६८ ते १९७० दरम्यान मराठवाडा विभागातील नांदेड, लातूर, परभणी व उस्मानाबाद जिल्ह्यांतील अनेक कुटुंबे जिवती परिसरात येऊन स्थायिक झाली. त्यावेळी परिसर पूर्णतः जंगलमय होता व कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या. नागरिकांनी जंगल तोडून शेती सुरू केली. त्यानंतर प्रशासनाने १९८४ पासून जमिनींच्या पट्ट्यांची प्रक्रिया सुरू केली आणि १९९० ते १९९२ पर्यंत अनेक कास्तकारांना पट्टे वाटप करण्यात आले. काही जमिनींच्या अतिक्रमण नोंदीही करण्यात आल्या.
त्याकाळात अतिक्रमण नोंदवही, अतिक्रमण १-ई, ७/१२ उतारा, गाव नमुना ८-अ व पेरे पत्रक अशा विविध नोंदी तयार करण्यात आल्या. मात्र त्यावेळी जिवती तालुका राजुरा व कोरपना तालुक्याशी जोडलेला असल्याने तसेच दळणवळणाच्या सुविधांचा अभाव असल्यामुळे अनेक कास्तकारांना तहसील कार्यालयात जाऊन फेरफार प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. झेरॉक्सची सुविधा नसल्याने पट्ट्यांच्या मूळ प्रती पटवारी व मंडळ अधिकाऱ्यांकडे देण्यात आल्या; मात्र अनेक कागदपत्रे अधिकाऱ्यांकडेच राहिल्याचे सांगण्यात आले आहे.
कास्तकारांचे म्हणणे आहे की, केवळ फेरफार पंजीलाच आधार मानून ७/१२ वरील नावे कमी करणे योग्य नाही. कोणत्याही प्रकरणात अतिक्रमण नोंदवही, अतिक्रमण १-ई, पेरे पत्रक, ७/१२, गाव नमुना ८-अ तसेच इतर कागदपत्रांची पडताळणी करावी. सध्या ४० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व अतिक्रमण १-ई नोंदीत नाव असलेल्या कास्तकारांचे हक्क ग्राह्य धरावेत. कारण पट्टे वाटप प्रक्रिया १९९०–९२ पर्यंतच झाली होती. त्यामुळे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील किंवा १९९० नंतर जन्मलेल्या व्यक्तींचे ७/१२ वैध कसे ठरते, असा प्रश्न निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे.
केवळ फेरफार पंजीत नाव असल्याच्या आधारावर काही ७/१२ वैध ठरवले जात असल्याने तहसीलदारांनी याबाबत विशेष दक्षता घ्यावी, अन्यथा खरे पट्टाधारक फेरफार नसल्याने डावलले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, २ मार्च २०२६ रोजी तहसील कार्यालयात झालेल्या जनता दरबारातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला; मात्र महसूल व वन विभागाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे सांगण्यात आले.
परिसरात सिमेंट उद्योगासाठी लागणारी लाल माती व दगड यांसारखी खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात असल्याने काही कंपन्यांकडून सर्वेक्षण सुरू असल्याचा दावा करण्यात आला असून, ७/१२ अवैध ठरवून भविष्यात खनिज संपत्तीच्या व्यवहारासाठी मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.



