इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या सत्याग्रहाच्या समर्थनार्थ चंद्रपुरात भव्य ‘बाईक रॅली’

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ लोहारडोंगरी (ता. ब्रह्मपुरी) येथील प्रस्तावित लोह खाण प्रकल्पामुळे होणारा निसर्गाचा ऱ्हास आणि वाढता मानव-वन्यजीव संघर्ष लक्षात घेता, इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या ‘अन्नत्याग सत्याग्रहा’ला पाठिंबा देण्यासाठी व हि खान रद्द करण्यासाठी चंद्रपुरात भव्य ‘बाईक रॅली’ काढण्यात आली. “ताडोबा कॉरिडॉर वाचवा, लोहारडोंगरी खाण रद्द करा” अशा घोषणा देत शेकडो पर्यावरणप्रेमी, युवक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी या रॅलीत सहभाग नोंदवला. शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेल्या या रॅलीला चंद्रपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, यावेळी शालिनी भगत व शोभा वाघमारे यांनी वाघाच्या प्रतिकृती साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या रॅलीत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष लहामगे, महिला जिल्हाध्यक्षा कुंदा जेणेकर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, प्रोफेशनल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण कोंड्रा, माजी महापौर तथा नगरसेविका संगीता अमृतकर यांच्यासह नगरसेविका संगीता भोयर, नगरसेविका सुनंदा धोबे, नगरसेविका वैशाली महाडुळे, नगरसेविका करुणा चालखुरे, नगरसेवक राहुल घोटेकर, नगरसेवक राहुल चौधरी, प्रोफेशनल काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष मनीष तिवारी, प्रवीण काकडे, सुवर्णा लोखंडे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, राहुल तायडे, प्रसन्न शिरवार, सहजाद शेख, अतुल वाघमारे, ताजु भाई, गुंजन येरमे, मोनू रामटेके, गोविंदा अमृतकर, तुषार लहामगे, महेंद्र खेकारे, आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या सर्वांनी बंडू धोतरे यांच्या लढ्याला आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला.
रॅलीदरम्यान बोलताना काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष लहामगे यांनी प्रशासनाला इशारा दिला की, ताडोबा ते गडचिरोली या व्याघ्र भ्रमणमार्गातील १८,००० वृक्षांची कत्तल करून केवळ ३२ नोकऱ्यांसाठी निसर्गाचा बळी देणे जिल्ह्याच्या हिताचे नाही. जिल्हाधिकारी कार्यालयावर या रॅलीचा समारोप झाला. सरकारने या लोकहितकारी मागणीची दखल न घेतल्यास हे जनआंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.



