चिराई देवीच्या नावावरून पडले ‘चिरादेवी’ गावाचे नाव
तालुक्यातील चिरदेवी गावात १२ मार्चला होणार देवीची प्राणप्रतिष्ठा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील चिरादेवी गावाचा इतिहास हा स्थानिक श्रद्धा व परंपरेशी जोडलेला आहे. गावातील वडीलधाऱ्या नागरिकांच्या सांगण्यानुसार, या गावाचे नाव प्राचीन काळापासून पूजल्या जाणाऱ्या चिराई देवीच्या नावावरून पडले असल्याची मान्यता आहे. पूर्वी या परिसरात चिराई देवीचे पवित्र स्थान होते आणि गावातील नागरिक मोठ्या श्रद्धेने देवीची पूजा करत असत.
काळाच्या ओघात विविध कारणांमुळे देवीचे मूळ स्थान नष्ट झाले आणि त्या परंपरेत काही प्रमाणात खंड पडला. मात्र गावकऱ्यांच्या मनातील देवीबद्दलची श्रद्धा कायम राहिली. आता गावातील युवक मंडळ, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने पुन्हा एकदा चिराई देवीची विधीवत स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या उपक्रमासाठी गावातील नागरिकांनी एकत्र येत नियोजन सुरू केले असून मंदिर बांधकाम व परिसराची स्वच्छता, सजावट तसेच धार्मिक विधींची तयारी सुरू आहे. स्थापनेच्या दिवशी पूजा-अर्चा, होम-हवन, भजन-कीर्तन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
या धार्मिक कार्यक्रमामुळे गावातील सामाजिक ऐक्य अधिक दृढ होण्यास मदत होईल, तसेच गावाच्या सांस्कृतिक परंपरेला पुन्हा एकदा उजाळा मिळेल, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी उत्सुक असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
ग्रामस्थांच्या मते, चिराई देवी ही गावाची ग्रामदेवता मानली जाते आणि तिच्या कृपेने गावात सुख-समृद्धी नांदते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे अनेक वर्षांनंतर होत असलेली ही स्थापना गावासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात असून हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
चिरादेवी गावात होणाऱ्या या धार्मिक उपक्रमामुळे परिसरातील भक्तांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून स्थापनेच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांनीही या सोहळ्यासाठी सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.



