भद्रावतीमध्ये रेतीची अवैध वाहतूक : वाहन जप्त
उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांची धडाकेबाज कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरात अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनावर उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांनी कारवाई करीत वाहन जप्त करून तहसील कार्यालयात जमा केले. या कारवाईमुळे परिसरातील रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
एका मालवाहू वाहनातून अवैध रेतीची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांना मिळाली होती. त्यानुसार तातडीने कारवाई करीत शनिवारी सायंकाळच्या सुमारास वृंदावन सभागृह परिसरातून जात असलेल्या एका मालवाहू वाहन (क्रमांक एमएच ३४, बीझेड ९३०३) ची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनात सुमारे एक ब्रास अवैध रेती आढळून आली. हे वाहन गजानन पिंपळकर (रा. जेना) यांच्या मालकीचे असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर संबंधित वाहन ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.
ही कारवाई उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार मनोज आकनूरवार, मंडळ अधिकारी मनोजकुमार भोयर, ग्राम महसूल अधिकारी शुभम धात्रक, वामन राजूरकर, ताराचंद खोब्रागडे यांना पाचारण करून पुढील कारवाई करण्यात आली.
उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांच्या या धडक कारवाईमुळे भद्रावती परिसरात अवैध रेती वाहतुकीवर प्रशासनाचा अंकुश बसणार असल्याची चर्चा सुरू आहे.



