मंगळवारी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने संघटनेचे सरकार्यवाह तथा आमदार श्री. सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात मंगळवार दि. १० मार्च २०२६ रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयासमोर धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.
राज्यातील खाजगी, स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे संचालित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, खाजगी अनुदानित शाळा, विजाभज तसेच आदिवासी आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
सदर आंदोलनात राज्यातील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व राज्य कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करणे, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त परंतु नंतर १०० टक्के अनुदान मिळालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देणे, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीवरील बंदी उठविणे, शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरणे तसेच शिक्षकांना १०-२०-३० वर्षांची आश्वासित प्रगती योजना लागू करणे अशा प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत. याशिवाय नक्षलग्रस्त भागात कार्यरत शिक्षक व कर्मचाऱ्यांना १५% नक्षलग्रस्त भत्ता देणे, अंशतः अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधा व इतर सेवा लाभ देणे, विद्यार्थ्यांच्या हितासाठी २० पटाखालील शाळा बंद न करण्याची मागणी, तसेच राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी व अन्य मागण्यांचा समावेश आहे.
या आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुनील शेरकी, जिल्हा कार्यवाह दीपक धोपटे, महानगर अध्यक्ष मोहम्मद शकील, महानगर कार्यवाह सुरेंद्र अडबाले व जिल्हा, तालुका पदाधिकारी, सदस्यांनी केले आहे.



