लोकाभिमुख निर्णयांनी समृद्ध असा राज्याचा अर्थसंकल्प – आ. किशोर जोरगेवार

चांदा ब्लास्ट
राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प हा २०४७ पर्यंत विकसित महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टीने दूरदृष्टी ठेवून मांडलेला असल्याची प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त समिती स्थापन करणे, संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करणे तसेच बाबासाहेब आंबेडकर शताब्दी वर्षानिमित्त रायगड येथे पायाभूत सुविधा उभारण्याची घोषणा ही सामाजिक व सांस्कृतिक वारशाचा सन्मान करणारी आहे. तसेच अजितदादा पवार यांच्या कार्याला श्रद्धांजली म्हणून स्मारक व नागरी पुरस्कार सुरू करण्याची घोषणा ही त्यांच्या योगदानाचा गौरव करणारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या अर्थसंकल्पातील विविध योजना आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे चंद्रपूर जिल्ह्यालाही मोठा फायदा होणार आहे. ग्रामीण रस्त्यांचा विकास, शेतकऱ्यांसाठीच्या योजना, नैसर्गिक शेती अभियान, उद्योगांना चालना देणारे धोरण तसेच विदर्भातील औद्योगिक व पर्यटन विकासाच्या योजनांमुळे चंद्रपूर जिल्ह्यात रोजगारनिर्मिती आणि विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा तिसरा टप्पा, हजारो किलोमीटर रस्ते व पूल, मुंबई–पुणे जलदगती ट्रेन, मेट्रो व द्रुतगती मार्ग यांसारख्या प्रकल्पांमुळे राज्याच्या पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार आहे. शेती क्षेत्रात अॅग्रीस्टॅक, फार्मर आयडी, एआयचा वापर, नैसर्गिक शेती अभियान तसेच शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे त्यांनी सांगितले.
नवीन गुंतवणूक धोरण, सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग केंद्र, सौरऊर्जा प्रकल्प, बांबू विकास आणि गडचिरोली स्टील हब यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी भरीव तरतूद केल्यामुळे महिलांच्या सक्षमीकरणाला बळ मिळेल. एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा सकारात्मक व लोकाभिमुख अर्थसंकल्प असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.



