वेकोलि खाणीत कोळसा चोरीचा मोठा भांडाफोड
वजन न करता ट्रक बाहेर ; ५ सुरक्षा रक्षकांवर कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने
वेकोलि खाणीत कोळसा घोटाळ्याची शंका
वरोरा : वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड माजरी क्षेत्रातील ऐकोना उपक्षेत्रीय कोळसा खाण क्रमांक-२ मधून मोठ्या प्रमाणात कोळसा चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना २६ व २७ फेब्रुवारी रोजी घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी वेकोलि प्रशासनाने वरोरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणात मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील एका ट्रान्सपोर्ट कंपनीचे ट्रक २६ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत वजन न करता कोळसा भरून स्वयंचलित बॅरिअर पार करून बाहेर गेले. याच प्रकाराची पुनरावृत्ती २७ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे २ वाजता झाल्याचे समोर आले आहे.
संशयास्पद हालचाल लक्षात आल्याने डिस्पॅच अधिकारी मुकेश गजभिए यांनी सतर्कता दाखवत माजरी क्षेत्राचे महाव्यवस्थापक राकेश प्रसाद यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली असता या घटनेची पुष्टी झाली.
महाव्यवस्थापकांच्या आदेशानुसार क्षेत्रीय सुरक्षा अधिकारी एस. के. बैरवा यांनी ४ मार्च रोजी वरोरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी वेकोलिचे पाच सुरक्षा रक्षक यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सतर्कता पथक करणार असून दोषींना कुठल्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, अशी माहिती महाव्यवस्थापक राकेश प्रसाद यांनी दिली.
दरम्यान, वेकोलिकडून लेखी तक्रार प्राप्त झाली असून प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती वरोरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार ओमप्रकाश सोनटक्के यांनी दिली.
*कोळसा चोरीचे प्रकार नवे नाहीत*
वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडच्या कोळसा खाणींमधून कोळसा चोरीचे प्रकार यापूर्वीही समोर येत राहिले आहेत. मात्र अनेकदा या प्रकरणांवर ठोस कारवाई होत नसल्याची चर्चा स्थानिक पातळीवर होत असते.
या वेळी एकोणा उपक्षेत्रीय कोळसा खाण क्र -२ मधून कोळसा चोरी प्रकरण हा सीसीटीव्ही फुटेजमुळे प्रकार उघड झाला आहे. हा गैरप्रकार नेमका किती दिवसांपासून सुरू होता आणि यात कोणकोणते अधिकारी, कर्मचारी व ट्रान्सपोर्ट कंपन्या सहभागी आहेत, याबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत. फक्त सुरक्षा रक्षक इतका मोठा धोका पत्करू शकत नाहीत, अशीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन मोठी नावे समोर येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



