नदीमध्ये बुडून खरकाडा येथील दोन युवकाचा मृत्यू
होळीच्या दिवशी गावांत शोककळा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी :_ मित्रांसोबत नदीकाठी पार्टी करण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही धक्कादायक घटना १ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ब्रह्मपुरी तालुक्यातील खरकाडा येथे घडली. शुभम विजय सहारे (१९) आणि शुभम पुष्पराज बगमारे (२४) अशी वाहून गेलेल्या युवकांची नावे आहेत.
गावकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खरकाडा गावातील ७ ते ८ मित्र रविवारी सुटीचा आनंद घेण्यासाठी वैनगंगा नदीच्या काठावर गेले होते. जेवणाचा बेत नदीच्या पलीकडे असलेल्या कोंढाळा बाजूला आखण्यात आला. सर्वांचे जेवण आटोपल्यानंतर सायंकाळच्या सुमारास परतत असताना पिंपळगाव-खरकाडा हद्दीतील नदीपात्रात काही मित्रांनी आंघोळीचा मोह आवरता आला नाही.
शुभम सहारे, शुभम बगमारे यांच्यासह राज सहारे आणि गौरव वाघधरे हे चौघेही आंघोळीसाठी नदीत उतरले. मात्र, या ठिकाणी खोल डोह असल्यामुळे पाण्याचा अंदाज आला नाही आणि चौघेही बुडू लागले. यावेळी उपस्थित इतर मित्रांनी प्रसंगावधान राखून राज आणि गौरव या दोघांना सुखरूप बाहेर काढले, मात्र दोन्ही ‘शुभम’ पाण्यात बुडू लागले.घटनेची माहिती मिळताच गावकरी आणि ब्रह्मपुरी पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली.
१ मार्च रोजी सायंकाळी अंधार पडल्यामुळे शोधकार्यात अडथळे आले, परिणामी मोहीम थांबवावी लागली. आज, २ मार्च रोजी सकाळपासून स्थानिक मच्छिमार आणि प्रशासनाच्या मदतीने पुन्हा शोधकार्याला सुरुवात करण्यात आली आहे.परंतु अजून पर्यंत दोन्ही मृतदेह आढळून आले नाहीत.



