ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राजुरा आगाराच्या ताफ्यात १५ नवीन बसेस दाखल होणार!

आमदार देवराव भोंगळे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

राजुरा, कोरपना आणि जिवती तालुक्यातील प्रवाशांची गेल्या अनेक वर्षांपासूनची दळणवळणाची समस्या आता मार्गी लागणार आहे. राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. देवराव भोंगळे यांनी शासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले असून, राजुरा आगारासाठी १५ नवीन बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे परिसरातील प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

राजुरा आगार हे चंद्रपूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे आगार मानले जाते. या आगारांतर्गत राजुरा, कोरपना व जिवती हे तालुके येत असून जिवती हा तालुका अतिदुर्गम, डोंगराळ आणि ‘आकांक्षित’ तालुक्यांच्या यादीत येतो. या तिन्ही तालुक्यांची भागातील भौगोलिक परिस्थिती पाहता, येथील नागरिकांना प्रवासासाठी एसटी बसवर अवलंबून राहावे लागते. मात्र, गेल्या काही काळापासून बसगाड्यांची कमतरता आणि जुन्या गाड्यांची दुरवस्था यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. हीच बाब लक्षात घेऊन आमदार देवराव भोंगळे यांनी परिवहन विभागाकडे नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरली होती.

या १५ नवीन बसेसमुळे आता राजुरा, कोरपना आणि जिवती या तीनही तालुक्यातील ग्रामीण भागातील बस फेऱ्यांचे नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करता येईल. विशेषतः शालेय विद्यार्थी, शेतकरी, महिला आणि नोकरदारांना या सुविधेचा मोठा फायदा होणार आहे. दुर्गम भागातील गावांना आता वेळेवर बस उपलब्ध होणार असल्याने, या क्षेत्राच्या विकासालाही गती मिळणार आहे.

आमदार देवराव भोंगळे यांच्या या यशस्वी प्रयत्नांमुळे राजुरा आगाराचा कायापालट होणार असून, प्रवाशांना आता सुखकर आणि सुरक्षित प्रवासाची खात्री मिळाली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये