नांदा ग्रामपंचायतीकडे ओपन स्पेस जतन व अतिक्रमणावर कारवाईची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
नांदा येथील सर्वे क्रमांक 15/1/अ मधील गुंठेवारी लेआउटमध्ये ओपन स्पेस जतन करून सार्वजनिक वापरासाठी विकसित करावे तसेच लेआउटमधील रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य अभय मुनोत यांनी ग्रामपंचायतीकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सन 1986-87 दरम्यान आवारपूर–गडचांदूर रोडलगत असलेल्या या शेतजमिनीचे प्लॉटमध्ये रूपांतर करून विक्री करण्यात आली होती. त्यावेळी शेतमालकांनी नियमानुसार नकाशा तयार करून प्लॉट व रस्त्यांची आखणी केली होती. सध्या या ठिकाणी अनेक नागरिकांनी घरे बांधली असून ग्रामपंचायतीमार्फत मालमत्ता करही आकारला जात आहे.
दरम्यान, गुंठेवारी पद्धतीने लेआऊट टाकून विक्री करण्यात आल्याने मा. तहसीलदार, कोरपना यांनी दिनांक 18 जून 2018 रोजी आदेश देत सदर जागेचा निवासी वापर मान्य करून शासनाकडे कर व दंड भरण्याचे निर्देश दिले होते.
या लेआउटमध्ये सुमारे 535.50 चौरस मीटर जागा ओपन स्पेस म्हणून राखीव ठेवण्यात आली असून ती सध्या मोकळी आहे. या जागेचे संरक्षण करण्यासाठी तारेचे कंपाऊंड करून वृक्ष लागवड करावी व भविष्यात सार्वजनिक उपयोगासाठी राखीव ठेवावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
याशिवाय, ग्रामपंचायतीने या परिसरात मूलभूत सुविधा पुरवल्या आहेत. इलेक्ट्रिकल पोल, पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन तसेच वीज मीटरसाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तसेच उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले यांच्या घरापासून चौधरी यांच्या घरापर्यंत सुमारे 200 मीटर सिमेंट काँक्रीट रस्ता UltraTech Cement च्या सीएसआर निधीतून बांधण्यात आला आहे.
मात्र, लेआउटमधील नकाशानुसार असलेल्या रस्त्यावर काही नागरिकांनी अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित अतिक्रमणधारकांविरोधात ग्रामपंचायत नोंदवहीत अधिकृत नोंद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी नियोजनबद्ध विकास होणे आवश्यक असून ओपन स्पेसचे जतन आणि अतिक्रमणमुक्त रस्ते ही काळाची गरज असल्याचे मत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले आहे.



