करंजी_जोगापूरातील गरजू कुटुंबीयांना गॅस कनेक्शन द्या
करंजीकरांचे वनविभागाला निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :- मानवी वस्तीमध्ये वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याने अधून – मधून गोंडपिपरी तालुक्यात मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना बघायला मिळतात. या टाळण्यासाठी म्हणून वनविभागाने उपाय योजना आखाव्यात, यासह करंजी_जोगापूर गावात गरजू कुटुंबांना गॅस कनेक्शन द्या, अशी मागणी करंजी गावातील युवकांनी वनविभागाला केली आहे. या संदर्भातील निवेदन सोमवारी (दि.12) कोठारी वनपरिक्षेत्राधिकारी मार्फतीने उपवनसंरक्षकांना देण्यात आले आहे.
तालुक्यातील करंजी हे मोठे गाव. या गावची लोकसंख्या 5000 च्या आसपास आहे. करंजी ग्रामपंचायत अंतर्गत करंजी, जोगापूर आणि दुबागुडा या गावांचा समावेश होतो. करंजी गावालगत जंगल आहे. करंजी परिसरातील नागरिक सरपनासाठी म्हणून अधून मधून जंगल शिवारात ये – जा करतात.
सद्यस्थितीत करंजीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बोरगाव परिसरात वाघाचा वावर आहे. यामुळे मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना नाकारता येत नाही. वनविभागही अलर्ट मोडवर आहे. मात्र नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. गॅस कनेक्शन पासून वंचित कुटुंबे जंगलाचा आधार घेऊ नये, यासाठी म्हणून गावातील गरजू कुटुंबीयांना गॅस कनेक्शन द्या, या मागणीचे निवेदन वनविभागाला देण्यात आले.
यावेळी शिष्टमंडळामध्ये समीर निमगडे, सागर आल्लूरवार, राकेश चापले, बादल देऊरमल्ले, विनोद तेल्कापल्लीवार, शुभम वैराग्यपवार, प्रशांत भडके आणि आकाश वाघाडे यांचा समावेश होता.
स्थानिक वन कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.गरजू कुटुंबाची यादी आणि निधीची उपलब्धता होताच कनेक्शन देण्यात येतील.
रुंदन कातकर,वनपरिक्षेत्राधिकारी,कोठारी.



