अवैध रेती वाहतुकीवर भद्रावतीत पोलिसांची धडक कारवाई
१२ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त : चार आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात भद्रावती पोलिसांनी कारवाई करीत सुमारे १२ लाख ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा ओ.एफ. चांदा परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी चार आरोपींचा समावेश असून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संबंधित परिसरात तपासणी करण्यात आली. या वेळी अवैध रेती उत्खनन व वाहतुकीसंदर्भात कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये रेती, ट्रॅक्टर, ट्रॉली आणि संबंधित साहित्याचा समावेश असून त्याची एकूण अंदाजित किंमत १२ लाख ३६ हजार रुपये असून
या प्रकरणात संदीप विश्वनाथ मरस्कोले (वय ४०), रा. जुना सुमठाणा, ता. भद्रावती, ऋषिकेश बंडू गोरे (वय २८), रा. खापरी वॉर्ड क्रमांक ६, ता. भद्रावती, संतोष राजूजी
घानोडे (वय ४०), रा. खापरी वॉर्ड क्रमांक ६, ता. भद्रावती आणि विजय पांडुरंग आडे (वय ३१), रा. खापरी, ता. भद्रावती, यांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ मधील कलम ४८ अन्वये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. तक्रारदार म्हणून पोलीस हवालदार अनुप आस्टूनकर आणि पोलीस अंमलदार योगेश घोटोळे, भद्रावती पोलीस ठाणे, यांची नावे देण्यात आली आहेत.
पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक तसेच वरोरा उपविभागाचे पोलीस अधिकारी संतोष बाकल आणि पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलीस हवालदार अनुप आस्टूनकर,देवानंद डुकरे, गोपाल आतकुलवार, प्रशांत शेंद्रे पोलीस अंमलदार योगेश घाटोळे, संतोष राठोड, खुशाल कावळे आणि महिला पोलीस अंमलदार मोनाली गारघाटे यांच्यासह भद्रावती पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामगिरी बजावली.
अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दाखल गुन्ह्यांचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.



