ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आयुध निर्माणीचे अग्निशमन वीर विशाल गौरकर यांचा समयसूचकपणा

फळ दुकानातील आग विझविण्यासाठी सरसावले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

    संकटाच्या प्रसंगी कर्तव्यनिष्ठा, प्रसंगावधान आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविणारे आयुध निर्माणी चांदा येथील अग्निशमन विभागाचे फायरमन विशाल गौरकर यांनी फळ दुकानाला लागलेली भीषण आग विझविण्यासाठी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या धाडसाचे व सेवाभावी वृत्तीचे भद्रावतीकरांकडून कौतुक होत आहे.

सोमवारी (दि. १२) सकाळी ९ वाजताच्या सुमारास भद्रावती येथील मेन रोडवरील संताजी नगर परिसरात डॉ. माला प्रेमचंद रुग्णालयाच्या बाजूला कैलास देशकर यांच्या प्लॉटमधील फळ दुकानाला अचानक आग लागली. विशेष म्हणजे, आयुध निर्माणी चांदा येथे रात्रपाळीची ड्युटी असल्याने विशाल गौरकर काही कामानिमित्त भद्रावतीत आले होते. दुकानाशेजारी मोटारसायकलजवळ उभे असताना त्यांच्या निदर्शनास दुकानाच्या मागील बाजूने निघणारा धूर व आगीच्या ज्वाळा पडल्या.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तत्काळ आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परिसरातील नागरिकांकडे पाण्याची मदत मागितली; मात्र अपेक्षित मदत न मिळाल्याने त्यांनी आयुध निर्माणीच्या अग्निशमन विभागाशी संपर्क साधला. त्यावेळी तहसीलदारांचा दूरध्वनी आल्यानंतरच अग्निशमन वाहन पाठविता येईल, असे सांगण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांनी नगर परिषद अग्निशमन दलाची मदत मिळविण्यासाठीही नागरिकांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

दरम्यान, आग वाढत असल्याचे लक्षात येताच त्यांनी नागरिकांना सुरक्षित अंतरावर राहण्याच्या सूचना दिल्या. काही वेळातच भद्रावती नगर परिषदेचे अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले. विशाल गौरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आपली ओळख सांगून अग्निशमन नळी हातात घेतली आणि आग विझविण्याच्या कामात सक्रिय सहभाग नोंदविला. त्यांच्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणण्यास मदत झाली.

कर्तव्यापलीकडे जपली माणुसकी!

आयुध निर्माणीतील नियमित कर्तव्य बजावत असतानाच सार्वजनिक ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास निःस्वार्थपणे मदतीसाठी धावून जाणारे विशाल गौरकर यांनी आपल्या कृतीतून कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकीचा प्रत्यय दिला. त्यांच्या या धाडसी कार्याबद्दल भद्रावतीकरांच्या वतीने अग्निशमन वीर विशाल गौरकर यांना सलाम!

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये