भद्रावतीत आगीत फळविक्रेत्याचे दुकान भस्मसात!
सहा लाखांचे साहित्य व फळे जळून खाक : दीड लाखांची रोकडही आगीच्या भक्ष्यस्थानी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरातील बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वाराजवळ असलेल्या फळविक्रेत्याच्या दुकानाला सोमवारी (दि. १२) सकाळी अचानक आग लागल्याने दुकानातील फळे, साहित्य आणि रोख रकमेसह मोठे नुकसान झाले. या आगीत अंदाजे सहा लाख रुपयांचे साहित्य व फळे जळून खाक झाली, तर गल्ल्यात ठेवलेली सुमारे दीड लाख रुपयांची रोकडही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. नवरात्रोत्सवाच्या ऐन व्यवसायाच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे फळविक्रेत्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.
भद्रावती येथील राहुल लटारी भागवत (वय ६२) हे फळविक्रीचा व्यवसाय करतात. बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वाराजवळ डॉ. माला प्रेमचंद यांच्या दवाखान्याशेजारील जागेत त्यांनी टिनपत्र्याचे दुकान उभारले होते. नवरात्रोत्सव सुरू झाल्याने सोमवारी सकाळी साडेसात वाजताच त्यांनी दुकान उघडून फळांची विक्री सुरू केली होती. दुकानासमोर फळांची आकर्षक मांडणी करण्यात आली होती. ग्राहकांची वर्दळ सुरू असतानाच सकाळी सुमारे नऊ वाजताच्या सुमारास दुकानाच्या आतील भागात अचानक आग लागली.
दुकानात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे कॅरेट आणि छताला प्लास्टिकचे तावदान असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले. आग वेगाने पसरल्याने दुकानातील फळे आणि इतर साहित्याला आगीने वेढले. पाहता पाहता संपूर्ण दुकान आगीच्या विळख्यात सापडले आणि मोठ्या प्रमाणावर साहित्य जळून खाक झाले.
या घटनेत सर्वाधिक दुर्दैवी बाब म्हणजे व्यापाऱ्यांकडून माल खरेदी करण्यासाठी ठेवलेली सुमारे दीड लाख रुपयांची रोकडही आगीत जळून गेली. राहुल भागवत हे दुकानासमोर ग्राहकांशी व्यवहार करण्यात व्यस्त असतानाच ही घटना घडली. परिसरात रहदारी सुरू असतानाही आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर याप्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस हवालदार निखिल कौरासे यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून आगीच्या कारणाचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे.
नवरात्रोत्सव हा फळविक्रीच्या दृष्टीने महत्त्वाचा काळ असताना अचानक आगीने दुकान उद्ध्वस्त झाल्याने राहुल भागवत यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आयुष्यभराच्या व्यवसायातून उभा केलेला माल आणि व्यवहारासाठी साठवलेली रोकड क्षणार्धात नष्ट झाल्याने या फळविक्रेत्यावर आर्थिक संकटाचा डोंगर कोसळला आहे. आगीचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.



