दुष्काळी परिस्थितीत लांबोरीत केसर आंब्याची वृक्षलागवड
‘हरित ग्राम, सुंदर ग्राम, समृद्ध ग्राम’चा संकल्प; श्रमदानातून ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- डोंगराळ आणि दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या जिवती तालुक्यातील ग्रामपंचायत लांबोरी येथे पर्यावरण संवर्धन, हरित ग्रामनिर्मिती आणि भविष्यातील आर्थिक समृद्धीच्या उद्देशाने केसर आंब्याच्या रोपांची वृक्षलागवड करण्यात आली. व्हीबी-जी राम जी योजना आणि जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान करीत सहभाग नोंदविला.
ग्रामपंचायत कार्यालय परिसर आणि आदि सेवा केंद्र येथे आयोजित या वृक्षलागवड मोहिमेत महिला, पुरुष, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी एकत्र येत केसर आंब्याची रोपे लावली. डोंगराळ भागातील प्रतिकूल परिस्थितीतही लोकसहभागातून गावाचा विकास साधता येतो, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
वृक्षलागवडीमुळे गाव परिसर हिरवागार होण्यासोबतच भविष्यात फळझाडांच्या माध्यमातून आर्थिक समृद्धीच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या उपक्रमाला गटविकास अधिकारी लक्ष्मीनारायण दोडके, विस्तार अधिकारी धनराज डुकरे, ग्रामपंचायत अधिकारी संकेत चहाकाटे, उमेश सुरडकर, विजय मडावी आणि अमित मडावी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सरपंच मोतीराम सिडाम, उपसरपंच कमलाकर जाधव, आरोग्य अधिकारी, शिक्षकवृंद, शाळेतील विद्यार्थी, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वृक्षलागवड केल्यानंतर रोपांचे नियमित संगोपन आणि संवर्धन करणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. केवळ वृक्षलागवड न करता लावलेली झाडे जगविण्याची जबाबदारीही ग्रामस्थांनी सामूहिकरीत्या स्वीकारावी, असे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मनरेगाचे चांदेकर, पीटीओ सागर बसणवार आणि रोजगार सेवक योगेंद्र कायत यांचे विशेष सहकार्य लाभले. ‘एक झाड लावूया, निसर्गाचे ऋण फेडूया’ या संकल्पनेतून ग्रामपंचायत लांबोरीने राबविलेला हा उपक्रम दुष्काळी व डोंगराळ भागात पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभागातून ग्रामविकास साधण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.



