माझी वसुंधरा अभियानात सावली तालुक्याचा राज्यात मानाचा तुरा
चिखली ग्रामपंचायत राज्यात प्रथम तर जीबगाव ग्रामपंचायत दुसऱ्या स्थानी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या *माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत* सावली तालुक्यातील ग्रामपंचायत *चिखली* हिने *राज्यात प्रथम क्रमांक* पटकावत 1.50 कोटी रुपयांचे बक्षीस मिळवले, तर *जिबगाव* ग्रामपंचायतीने *द्वितीय क्रमांक* मिळवत 75 लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले. तसेच सावली पंचायत समितीने विभागीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
निसर्गाच्या पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वांवर आधारित जीवनपद्धती अंगीकारल्याशिवाय मानवजातीला निसर्गासोबत शाश्वतरीत्या जगणे शक्य नाही. जैवविविधतेचे अस्तित्व टिकवण्यासाठी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहभागातून पंचतत्त्वांवर आधारित उपाययोजना राबवून निसर्गपूरक जीवनशैली विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांनी दिनांक २ ऑक्टोबर २०२० पासून “माझी वसुंधरा” अभियान सुरू केले आहे.
माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत मिना साळुंखे उप मुख्य कार्यकारी पंचायत व *श्री.मुक्तेश्वर कोमलवार*, गटविकास अधिकारी सावली यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील 54 ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला. भूमी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वांवर आधारित विविध उपक्रम प्रभावीपणे राबवून त्यांनी स्पर्धेत विशेष स्थान मिळवले. या यशामध्ये राजू परसावर, सहाय्यक गटविकास अधिकारी तथा विस्तार अधिकारी (पंचायत), कार्यालयीन विभाग प्रमुख,सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, डेटा एंट्री ऑपरेटर व शिपाई,ग्राम रोजगार सेवक, सि.आर.पी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
स्पर्धेत विशेष यश संपादन करणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंच,ग्रामपंचायत अधिकारी, व गटविकास अधिकाऱ्यांचा मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मुंबई येथे विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
लोकसहभाग, प्रभावी नियोजन आणि पर्यावरण बदलाबाबतची दृढ बांधिलकी यामुळे सावली तालुक्यातील ग्रामपंचायत चिखलीने राज्यात अव्वल तर जिबगावने द्वितीय स्थान मिळवून पर्यावरण संवर्धनाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.



