ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जनता दरबारात दाखल प्रत्येक समस्येचे निराकरण झाले पाहिजे – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

जनता दरबारला जिल्हाभरातील नागरिकांची उपस्थिती ; रात्री उशिरापर्यंत तब्बल ६ चालला जनता दरबार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 पालकमंत्र्यांचा 350 हून अधिक निवेदनकर्त्यांशी संवाद

वर्धा :_ पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय जनता दरबार घेण्यात आला. जिल्हाभरातील नागरिकांनी या दरबारला उपस्थित राहून आपले निवेदन, तक्रार, समस्या पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. जवळजवळ ३५० हून अधिक निवेदने पालकमंत्र्यांनी स्वीकारली. आलेल्या प्रत्येक नागरिकाशी आत्मियतेने संवाद साधत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व संबंधितांना त्यांच्या तक्रारींवर वेळेत कारवाई करण्याचे निर्देश दिले.

सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या कालमर्यादेत निकाली निघाल्या पाहिजे. प्रशासनाकडे त्यांच्या प्रलंबित असलेल्या समस्या, प्रकरणांचा निपटारा गतीने व्हावा, यासाठी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्याच संकल्पनेतून या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीपती मोरे, वर्धा नगरपरिषदेचे उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर यांच्यासह सर्व विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते.

सकाळी ११ वाजता नोंदणीस सुरुवात झाली. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांनी नोंदणीसाठी गर्दी केली होती. सभागृहासमोर मांडण्यात आलेल्या नोंदणी टेबलवरून प्रशासनाच्यावतीने प्रत्येकाला टोकन क्रमांक देण्यात आले. दुपारी २ वाजता जनता दरबारास सुरुवात झाल्यानंतर पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी स्वत: प्रत्येकाचे निवेदन स्वीकारले. त्यांचे म्हणणे, समस्या जाणून घेतल्या. आलेल्या प्रत्येकाशी आत्मियतेने संवाद साधला.

जनता दरबारास सर्व जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते. काही प्रकरणात तक्रारदार व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी समोरसमोर चर्चा करून प्रकरण तातडीने निकाली काढण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. आपल्या समस्या, प्रश्न निकाली निघतील या अपेक्षेत जिल्हाभरातून नागरिक जनता दरबारात उपस्थित राहिले आहे. त्यामुळे त्यांच्या निवेदनांवर कालमर्यादेत कारवाई करा. जनता दरबारातील एकही प्रकरण प्रलंबित राहू नये, असे निर्देश सर्व विभागप्रमुख अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी दिले.

*रामनगर लीज नुतनीकरण कारवाई तातडीने करा*

वर्धा शहरातील रामनगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या भुखंड लीजचे नुतनीकरण करण्याचा विषय आपण मार्गी लावला आहे. त्यामुळे लीज नुतनीकरण करण्याची कारवाई तातडीने करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी वर्धा नगरपरिषद मुख्याधिकारी यांना दिले. तसेच सिंधी समाजाच्या वास्तव्यातील जमीनीचे भूखंड शासनाच्या निर्णयान्वये फ्री होल्ड करण्याच्या कारवाईबाबतही निर्देश दिले.

*अनेक विषयांचे निवेदने प्राप्त*

जनता दरबारात जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांनी आपल्या समस्या, तक्रारी, प्रश्नच मांडले असे नाहीत, तर मागण्यांची निवेदने देखील सादर केली. दाखल निवेदनांमध्ये महसूल, भूमी अभिलेख, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पट्टे वाटप, मुख्यमंत्री शेत पाणंद रस्ते, ग्रामीण पाणीपुरवठा अशा प्रमुख विषयांचा समावेश होता. दुपारी २ वाजता सुरु झालेला जनता दरबार तब्बल ६ तास चालला.

सुरुवातीस दिप प्रज्वलन करून जिल्हास्तरीय जनता दरबारचे उद्घाटन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे यांनी प्रास्ताविक केले. सर्वसामान्यांच्या समस्या निकाली निघाल्या पाहिजे, या भावनेतून पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला हा चौथा जनता दरबार असल्याचे श्री.कारंडे यांनी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये