क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमातून काम करण्यासाठी नवीन कल्पना व दिशा मिळेल – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : वेगवेगळ्या विभागांच्या क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक न भेटलेल्या अधिकाऱ्यांच्या भेटी होत असतात. त्याच पद्धतीने एकमेकांसोबत समन्वय होत असतो आणि आपण आपल्या भागामध्ये काय काम केलं किंवा आपल्या कार्यालयामध्ये काम करण्याची पद्धत कशी अवलंबली याच्यामध्ये चर्चा होते. त्यामुळे अशा क्रीडा स्पर्धा उपयुक्त ठरत असून अधिकारी, कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी नवीन कल्पना व दिशा मिळते, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याहस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मनिषा कुरसंगे, कार्यकारी अभियंता शुभम गुंडतवार, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांच्यासह विविध विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. भोयर पुढे म्हणाले, वर्धा जिल्हा परिषदेचा राज्यामध्ये ज्या काही चांगल्या जिल्हा परिषदा आहेत त्यामध्ये क्रमांक लागतो. केंद्र सरकारची आकांक्षित तालुका म्हणून योजना होती. त्यामध्ये आपल्या वर्धा जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्याची निवड करण्यात आली आणि पंचायत समितीच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम, उपक्रम योजना राबविण्यात आले आणि कारंजा तालुका त्या अभियानामध्ये देशांमध्ये 27 वा क्रमांक आणि महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक पटकवला, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भाग आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबांना वेगवेगळ्या योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासोबतच अनेक उपक्रम आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवितो. वर्षभर आपण काम आणि कामच करत असतो. काम करत असतांना अनेक वेळेस स्वतःकडे दुर्लक्ष होत असते किंवा आपल्या कुटुंबाकडे पण दुर्लक्ष होत. त्यामुळे क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धातून काम करण्याची नवी उर्जा मिळते, असे त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण म्हणाले, वर्षभराचे काम आणि कामच यातून थोडेसे बाहेर पडून आपल्या कुटुंबीयांसमोर थोडेसे रिलॅक्स या स्पर्धेतून होता येईल. स्पर्धेच्या निमित्ताने दोन-तीन दिवस इथे एकत्र असणार आहोत. मनमोकळेपणाने आपल्याला जे येते ते सादर करा आणि कार्यक्रमाचा आनंद घ्या, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाची रूपरेषा व आयोजनामागची भूमिका अमोल भोसले यांनी सांगितली. संचालन व आभार मोहन सायंकार यांनी मानले. या कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी व कुटुंबिय मोठ्या संख्यंने उपस्थित होते.



