जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
आर्वी पोलिस स्टेशनच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन ; इमारत बांधकामावर ६ कोटी ६८ लाखांचा खर्च होणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची धुरा हाती घेतल्यापासून पोलिस प्रशासनाच्या इमारती, निवासस्थाने बांधकामास मोठ्या प्रमाणावर निधी दिला. जिल्ह्यात देखील अनेक इमारती आपण बांधल्या. पोलिस बांधवांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यावर आपला भर असल्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.
आर्वी येथे पोलिस स्टेशनच्या प्रशासकीय इमारत बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री डॉ.भोयर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आ.दादाराव केचे, आ.सुमित वानखेडे, माजी आमदार सुधाकर कोहळे, नगराध्यक्ष स्वाती गुल्हाणे, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपवनसंरक्षक हरविर सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय अधिकारी विश्वास सिरसाठ, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर ढोले, तहसीलदार हरीश काळे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात पोलिस अधीक्षक कार्यालय, वर्धा पोलिस स्टेशनसह अनेक इमारती व निवासस्थाने झाली. हिंगणघाट येथे नुकतेच इमारतीचे उद्घाटन केले. आज आर्वी येथे पोलिस स्टेशन इमारतीचे उद्घाटन होत आहे. पोलिसांना चांगल्या इमारती, सुविधा आपण देतो आहे. अत्याधुनिक साधने, पायाभूत सुविधांच्या माध्यमातून जिल्ह्याचे पोलिस प्रशासन, कायदा व सुव्यवस्था निश्चितच अधिक मजबूत होणार आहे, असे पुढे बोलतांना पालकमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले.
वर्धा हा दारुबंदी असलेला जिल्हा आहे. अवैध दारू विरोधात पोलिसांनी कारवाई केल्यानंतर दारु नमुने तपासणीसाठी नागपूरला प्रयोगशाळेत पाठवावे लागते. जिल्ह्यातच न्याय सहाय्य वैद्यकीय प्रयोगशाळा व्हावी, अशी भूमिका मी मांडली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य केली असून लवकरच ही प्रयोगशाळा वर्धेत साकारणार आहे. राज्यात २५५ मोबाईल व्हॅन आपण दिल्या. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयांना या व्हॅन देण्यात आल्या असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
आर्वीत अनेक विभागांच्या इमारती झाल्या. आ.सुमित वानखेडे यांच्या नेतृत्वात अनेक कामे होत आहे. भविष्यात आर्वीचा देखील कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेला समृद्धी महामार्ग विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने वर्धा शहरातून सर्व दिशेने जाणारे सर्व रस्ते राष्ट्रीय महामार्ग झाले. या मार्गांना केवळ राष्ट्रीय दर्जाच नाही तर निधी देखील नितीन गडकरी यांनी उपलब्ध करुन दिला असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
आर्वी येथील पोलिस स्टेशनची इमारत इंग्रजकालीन आहे. नवीन इमारत व्हावी, अशी अनेक वर्षांपासून मागणी होती. नव्या इमारतीतून नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे. अवैध धंदे, अवैध व्यवसायावर पोलिस प्रशासनाने लगाम घातला पाहिजे. पोलिस प्रशासनाने अधिक दक्ष राहून काम करावे, असे आपले मनोगत व्यक्त करतांना आ.दादाराव केले यांनी सांगितले.
पोलिस स्टेशन आर्वी येथे इमारत मंजूर केल्याबद्दल आ.सुमित वानखेडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. आर्वी येथे तहसील, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, नगर परिषद अशा अनेक इमारती झाल्या. कृषी विभागाची इमारत मंजुरीचा प्रयत्न आहे. प्रत्येक विभागाची स्वतंत्र इमारती असावी, अशी भूमिका आहे. पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी आर्वी, आष्टी, कारंजासाठी निधी कमी पडू दिला नाही. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा प्रस्ताव त्यांनी मंजूर केला. शहराच्या सुरक्षेसाठी यामुळे मोठा हातभार लागणार आहे. पोलिस स्टेशनच्या नवीन इमारतीतून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम व्हावे. नागरिकांच्या समस्यांसाठी पोलिस स्टेशनला फोन लावण्याची वेळ कोणत्याही लोकप्रतिनिधीवर येऊ नये, असे आ.वानखेडे म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी केले. आर्वी येथील पोलिस स्टेशनची नवीन इमारत १ हजार ५३३ स्क्वेअर मीटरवर बांधण्यात येणार असून इमारतीवर ६ कोटी ६८ लाख रुपयांचा खर्च होणार आहे. पोलिस प्रशासन समाजाचा अविभाज्य भाग आहे. नव्या इमारतीमुळे पोलिसांना चांगले वातावरण मिळेल आणि त्यांची कार्यक्षमता वाढवण्यास मदत होईल, असे पोलिस अधीक्षक श्री.अग्रवाल म्हणाले.
सुरुवातीस पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्याहस्ते कुदळ मारुन तसेच नामफलकाचे अनावरण करुन इमारत बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. आभार उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर ढोले यांनी मानले. कार्यक्रमास पोलिस अधिकारी, कर्मचारी, पोलिस पाटील, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*वीज वितरणच्या विभागीय कार्यालयाचे भूमिपूजन*
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या आर्वी येथील नवीन विभागीय कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते झाले. यावेळी आ.दादाराव केचे, आ.सुमित वानखेडे, माजी आमदार सुधाकर कोहळे, अधीक्षक अभियंता स्मिता पारखी, कार्यकारी अभियंता प्रशांत गायकवाड यांची उपस्थिती होती. नवीन विभागीय कार्यालयाची सुसज्ज इमारत 70 लाख 95 हजार रुपयाच्या निधीमध्ये तयार करण्यात येणार आहे.



