गोंडपिपरी तालुका काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्षपदी राजेश डोंगरे
प्रसारमाध्यमांतून पक्षाची ध्येयधोरणे जनसामान्यांत रुजविण्यासाठी नव्या नेतृत्वावर जबाबदारी; कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी.
आशिष रैच, राजुरा
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या “संघटन सृजन अभियान” अंतर्गत राज्यभर संघटन मजबुतीसाठी विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, गोंडपिपरी तालुक्यात काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे जनसामान्यांत रुजविण्यासाठी राजेश डोंगरे यांची सोशल मीडिया विभागाच्या तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निरीक्षकांनी जिल्हानिहाय दौरे करून स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. त्या अहवालाच्या आधारे तसेच जिल्हा काँग्रेस कमिटीने सादर केलेल्या प्रस्तावाला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मान्यता दिल्यानंतर राजेश डोंगरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
राजेश डोंगरे हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे, यशदा पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित विविध प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांचा “प्रवीण प्रशिक्षक” म्हणून सक्रिय सहभाग आहे. तसेच विविध सामाजिक संस्थांसोबत (NGO) काम केले आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून विविध विषयांवर मार्गदर्शन करणे, ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सोडविणे, युवकांना संघटित करणे तसेच पक्षाच्या विचारसरणीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे गोंडपिपरी तालुक्यात काँग्रेस पक्ष अधिक मजबूत होईल, असा विश्वास वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे पुरोगामी विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण भरीव कार्य कराल, तसेच पक्ष संघटना अधिक सक्षम आणि प्रभावीपणे उभी कराल, असा विश्वास नियुक्ती पत्रात व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, राजेश डोंगरे यांच्या निवडीबद्दल तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, आगामी स्थानिक राजकारणात काँग्रेसला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



