ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संतप्त ग्रामस्थांनी केरोडा ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप

सरपंच,उपसरपंच, सचिवाची ग्रामसभेला दांडी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

ग्रामस्थाचा आरोप ; विकासकामाचा बोजवारा 

 तालुक्यातील केरोडा ग्रामपंचायतीमधील कथित भोंगळ कारभार, ग्रामसभांकडे होत असलेले दुर्लक्ष आणि गावाच्या विकासकामांबाबतची उदासीनता यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अखेर ग्रामपंचायत कार्यालयालाच कुलूप ठोकत तीव्र निषेध नोंदविला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सुमारे २२०० लोकसंख्या असलेल्या केरोडा गावात विविध शासकीय योजनांमधून ग्रामविकासासाठी निधी उपलब्ध होत असतानाही त्या निधीचा योग्य वापर होत नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. गावातील मूलभूत समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना ग्रामपंचायतीकडून मात्र दुर्लक्ष केले जात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावातील विकासकामे, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, दिवाबत्ती तसेच विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यासाठी बोलावण्यात येणाऱ्या ग्रामसभांना सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक सचिव हेच अनुपस्थित राहत असल्याने ग्रामसभेचे महत्त्व कमी होत आहे. त्यामुळे गावकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळत नसून प्रशासनाकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला.

“ग्रामसभा ही गावाच्या विकासाचा केंद्रबिंदू असते. मात्र जबाबदार पदाधिकारीच गैरहजर राहत असतील तर गावाचा विकास कसा होणार?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. तसेच ग्रामपंचायतीत पारदर्शकता नसून विविध योजनांच्या निधीबाबत माहिती दिली जात नसल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे.

या सर्व प्रकारामुळे वैतागलेल्या ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गावातील समस्या तातडीने मार्गी लावाव्यात, ग्रामसभांना जबाबदार अधिकारी उपस्थित राहावेत आणि विकासनिधीचा हिशोब ग्रामस्थांसमोर मांडावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी दिलीप चलाख,विजय उंदीरवाडे, प्रशांत डोलणे,ढीवरु भुरसे, अंकुश सोदुलवार,सौरभ पिपरे, संकेत वदेलवार, कैलास सहारे, गुरुदेव पिपरे, विश्वनाद काटलाम, नामदेव पेंदोर,डोनु भंडारी,मंगेश शेडमाके, यशपाल कोहपरे,मानिक तुनकलवार सह गावातील बहुसंख्य ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये