कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समिती तर्फे नगरसेवक राजेश बदखल व ह.भ.प.सुवर्णा प्रकाश पिंपळकर यांचा सत्कार
सेवानिवृत्त जगन्नाथ भक्तांची स्वच्छता मोहीम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १४ येथील जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळ संचालित कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समिती तर्फे आज दिनांक १ फेब्रुवारी रोजी स्वीकृत सदस्य राजेश बदखल व वरोरा येथील श्री.गुरुदेव सेवा मंडळ यांचे वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यात राष्ट्रीय कीर्तनकार, गुरुदेव प्रचारक, श्रीमद् भागवत कथाकार हरी भक्त पारायण सौ. सुवर्णा प्रकाश पिंपळकर यांचा अखिल भारतीय श्री.गुरुदेवसेवा मंडळ, गुरुकुंज मोझरी तर्फे चंद्रपूर जिल्हा महिला सेवाधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा ही संयुक्त सत्कार सोहळा ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पार पडला. तद्वतच प्रबोधनकार पिंपळकर परिवारातर्फे व्यसन मुक्ती बद्दल समितीचे सदस्य बंडू परचाके यांचा समयोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून माजी प्राचार्य मांडवकर, तसेच कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समिती अध्यक्ष मंगेश येरमे, प्रकाश पिंपळकर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नित्यनियमाने वरद विनायक मंदिर परिसरात उपस्थित तरुण, जेष्ठ मंडळी व महिलांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्रसंगी बोलताना मान्यवरांनी स्वच्छता समिती च्या कार्याचा व स्वच्छतेच्या योगदानाचे विशेष कौतुक केले. जिथे प्रशासन सुद्धा स्वच्छतेच्या बाबतीत हतबल होते तिथे सेवानिवृत्त ज्येष्ठांचे साप्ताहिक स्वच्छता अभियान अभिनंदनीय आहे.नगर परिषद भद्रावती निश्चितच या कार्याची दखल घेऊन या समितीला प्रोत्साहित करेल तसेच एक जनसेवक म्हणून मी व्यक्तिशः तन मन धनाने सहकार्य करेल असे स्वीकृत सदस्य राजेश बदखल यांनी आवर्जून नमूद केले.
अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य मांडवकर यांनी समितीचे कार्य हे कर्मयोगी गाडगे महाराज यांच्या विचाराचे सुसंगत असून ते या समितीमार्फत प्रत्यक्ष आचरणात आणून ग्रामसफाई करण्यात येते हे अभिनंदनीय आहे.
कार्यक्रमाचे संचालन समितीचे मार्गदर्शक पत्रकार लिमेश माणूसमारे यांनी तर आभार प्रदर्शन अरुण येरकाडे यांनी केले. समिती सदस्य प्रभाकर निमकर यांनी भोजनदान दिले.सर्व सदस्यांच्या सहभागातून व विशेषतः शालू हजारे, विद्या खडसे, नलिनी माणूसमारे,निमकर व आसुटकर परिवाराने कार्यक्रम यशस्वी होण्यात मोलाचे सहकार्य केले.



