कायदेशीर अधिकार व वैध प्रक्रियेतून भुखंड विक्री : अध्यक्ष लहानु बावणे
संताजी नगर गृहनिर्माण संस्थेचे कथित भुखंड विक्री प्रकरण : पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आरोपांचे खंडन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील संताजी नगर गृहनिर्माण संस्थेच्या कथित भुखंड विक्री प्रकरण गाजत असताना आज दिनांक १९ जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेत संताजी नगर गृहनिर्माण संस्था अध्यक्ष लहानु सखाराम बावणे यांनी दिनांक १७ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेतून केलेल्या आरोपांचे खंडन केले. वादग्रस्त प्रकरणातील अध्यक्ष लहानु सखाराम बावणे यांनी सांगितले की मला दिलेल्या आम मुखत्यार अधिकाराच्या अधीन राहून व ठरावा नुसारच गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांना भुखंड विकल्या गेले यात संस्थेच्या सभासदाना नाममात्र दरातच प्लॉट देण्याचे ठरले असल्याने अतिरिक्त कोणत्याही करोड रुपयांचा अपहार झाला हे म्हणणे चुकीचे आहे.
पत्रकार परिषदेत संताजी गृहनिर्माण संस्थेच्या इतर सदस्यांनी माझे अधिकार काढले हे सर्वस्वी खोटे असून तसा कोणताही ठराव घेतला गेला नाही. किमान अडीच कोटी रुपयांचा अपहार हे सपशेल खोटे असून अश्या कोणत्याही मोठ्या रकमेचा अपहार झाला नाही.
या गृहनिर्माण संस्थेची उभारणी व इतर करविषयक दायित्व मी पार पाडले असल्याने सर्व सोपस्कार नियमाप्रमाणे झाले आहेत. बातचीत करताना प्लॉट धारक महेश लोणकर यांनी सांगितले की खुल्या प्लॉट वर सुरेश मस्के, युगेश खोब्रागडे, हरी खोब्रागडे, विनोद कांबळी यांना वाहने ठेवण्यास मज्जाव केल्यामुळे स्थानिक रहिवाश्यानी पत्र परिषदेचे कुंभाड रचून आम्हास बदनाम करण्याचे कारस्थान रचल्याचा आरोप केला. त्यांनी सर्व बेछूट आरोपांचे खंडन करून हे सर्व आरोप तकलादू, बेकायदेशीर व आकसापोटी असल्याने संबंधितावर कायदेशीर कारवाई करू असे बजावले. पार पडलेल्या पत्रकार परिषदेकरिता गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष लहानु सखाराम बावणे, महेश लोणकर, सुनील लहानु बावणे, निखिल सुनील बावणे आदी उपस्थित होते.



