भद्रावतीत चोरीच्या दोन घटना ; जैन मंदिरातील दानपेटी फोडली
घरफोडीत रोख-दागिने लंपास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरात चोरीच्या दोन स्वतंत्र घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एका घटनेत शहरातील प्रसिद्ध जैन मंदिरातील दानपेटीतून दहा हजार रुपयांची रोकड चोरीस गेली असून या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. दुसऱ्या घटनेत गुरु नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत रोख रक्कम व चांदीचे दागिने लंपास केले आहेत.
शहरातील प्रसिद्ध जैन मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात ठेवण्यात आलेल्या दानपेटीतून दहा हजार रुपये चोरीस गेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. काल, दिनांक १८ जानेवारी रोजी दुपारी ३ ते ४ वाजताच्या सुमारास ही चोरी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आज सकाळी मंदिराचे पुजारी पूजा करण्यासाठी आले असता दानपेटीतून रक्कम गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक भिकामचंद बोरा यांना याबाबत माहिती दिली. खातरजमा केल्यानंतर बोरा यांनी भद्रावती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून संशयावरून शुभम विठ्ठल झाडे (वय २७, रा. झाडे प्लॉट, भद्रावती) व ऋतिक जांभूळकर (वय २५, रा. झाडे प्लॉट, भद्रावती) या दोन तरुणांना ताब्यात घेतले. पोलिसी चौकशीत दोघांनीही चोरी केल्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दुसऱ्या घटनेत भद्रावती येथील गुरु नगर परिसरात राहणारे बबनराव पिसारकर हे बाहेरगावी गेले असताना दिनांक १८ जानेवारीच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून घरफोडी केली. या घरफोडीत चांदीचे दागिने व सुमारे पाच हजार रुपये रोख रक्कम असा एकूण मुद्देमाल चोरीस गेल्याचे उघडकीस आले आहे. ही बाब शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ घरमालक व पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
या दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास पोलीस ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, शहरात वाढत चाललेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.



