बोंडेगाव कुर्झा हद्दीत मिळाला अनोळखी मृतदेह

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी :_ शहरातील बोंडेगाव – कुर्झा मार्गावर आज सोमवारी सकाळी एका ५५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत गर्दी केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १९ 00 जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० : वाजताच्या सुमारास, ब्रह्मपुरी-बोंडेगाव कुर्झा मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना रस्त्याच्या कडेला एक इसम मृतावस्थेत पडून असल्याचे दिसले. नागरिकांनी या घटनेची माहिती तातडीने स्थानिक प्रशासनाला दिली. मृतक इसमाचे वय अंदाजे ५५ वर्षे आहे. प्राथमिक माहितीनुसार, सदर व्यक्ती ही परिसरात भीक मागून आपला उदरनिर्वाह करत होती. त्याची अद्याप अधिकृत ओळख पटलेली नाही.
थंडीचे दिवस आणि रात्रीच्या वेळी अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करीत घटनास्थळी चर्चा सुरू होती.घटनेची माहिती मिळताच ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रेवण कदम यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळ गाठले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून मृतदेहाचा रितसर पंचनामा केला. त्यानंतर, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट व्हावे यासाठी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करत असून, या व्यक्तीबाबत काही माहिती असल्यास पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



