गिरोली येथे धर्मनाथ बीज उत्सव प्रारंभ
20 जानेवारी रोजी समारोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा तालुक्यातील गिरोली बुद्रुक येथील श्री क्षेत्र दत्तगुरु सेवाभावी ट्रस्ट, गिरोली बु.यांचे वतीने वर्षभर विविध धार्मिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक उपक्रम मोठ्या भक्तिभावाने राबविले जात आहेत. समस्त गावकरी गिरोली बु. तसेच पंचांकृषितील सर्व भक्त मंडळी यांचे सहकार्याने हे मंदिर परिसर श्रद्धा, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचे केंद्र ठरत आहे.
मंदिरामध्ये श्री दत्तगुरु महाराज मूर्ती प्रतिष्ठापित असून तसेच श्री गोरक्षनाथ बाबा प्रकट दिन व पालखी सोहळा तसेच धर्मनाथ बीज महोत्सव, गुरुदेव दत्त नवरात्र उत्सव,नवनाथ पारायण सोहळा, श्री गुरुदत्त जयंती निमित्त पालखी सोहळा आणि गुरुचरित्र पारायण सोहळा, श्रावण मासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
दरवर्षी तिथी व तारखेनुसार मंदिराच्या वतीने अनेक वेळा अन्नदानाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. श्री गुरुदत्त जयंती तसेच श्रावण मासातील पहिल्या सोमवारी जवळपास दोन ते तीन क्विंटल अन्नदान करण्यात येते. या अन्नदानाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. भाविक भक्त यथाशक्ती अन्नदानासाठी सहकार्य करीत असल्याने मंदिराची सेवा परंपरा अधिक बळकट होत आहे.
श्री क्षेत्र दत्तगुरु मंदिरात श्री दत्तगुरुंची नित्य सेवा केली जात असून, अनेक भक्तांना या सेवेचा आध्यात्मिक अनुभव व प्रचिती आल्याचे सांगितले जाते. यामुळेच मंदिराची ख्याती दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, नाशिक, संभाजीनगर, जालना, बीड, चिखली, बुलढाणा, खामगाव, नागपूर, अमरावती आदी विविध ठिकाणांहून भाविक दर्शनासाठी येथे येतात.
सध्या दिनांक 10 जानेवारी 2026, शनिवारपासून श्री क्षेत्र दत्तगुरु सेवाभावी मंदिरात धर्मनाथ बीज उत्सव सोहळ्यास प्रारंभ झाला असून, या उत्सवाची सांगता दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी महाप्रसादाच्या कार्यक्रमाने होणार आहे. या कालावधीत विविध धार्मिक विधी, पूजा-अर्चा व भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
धार्मिकतेसोबतच सामाजिक उपक्रमांची सांगड घालणारे श्री क्षेत्र दत्तगुरु सेवाभावी मंदिर, गिरोली बुद्रुक हे परिसरातील श्रद्धेचे व सेवाभावाचे केंद्र म्हणून ओळखले जात असून, भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम राबविले जातील, अशी माहिती मंदिर समिती व समस्त गावकरी मंडळींनी दिली आहे.



