सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा व व्यक्तिमत्त्व विकासावर मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे “स्पर्धा परीक्षा व व्यक्तिमत्त्व विकास” या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या करिअर घडणीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवर मार्गदर्शकांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठीप्रमुख मार्गदर्शक म्हणून तृतीयपंथी कार्यकर्ती व लेखिका विजेंद्र टेंभुर्णे (चंद्रपूर), युवा लेखक, पत्रकार व संपादक सुरज दहागावकर(चंद्रपूर),तसेच सोनुर्ली येथील मेंढपाळ कुटुंबातून पुढे आलेले आणि बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन सेटलमेंट (IIHS) येथे एम.एस.सी. शिक्षण घेत असलेले सुमित काकडे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
तृतीयपंथी कार्यकर्ती व लेखिका विजेंद्र टेंभुर्णे यांनी आपल्या भाषणातून संघर्ष, आत्मस्वीकृती आणि स्वावलंबनाचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर मांडले. सामाजिक अडचणींवर मात करत शिक्षण, कला आणि कष्टाच्या जोरावर यश मिळवता येते, हा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला. व्यक्तिमत्त्व विकासात आत्मविश्वास, आत्मसन्मान आणि सातत्य आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
युवा लेखक व पत्रकार सुरज दहागावकर यांनी स्पर्धा परीक्षेसाठी वाचन, लेखन आणि चिकित्सक विचारशक्ती किती महत्त्वाची आहे यावर भर दिला. विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रे, संदर्भग्रंथ आणि वैचारिक साहित्य वाचण्याची सवय लावावी, तसेच स्वतःचे मत स्पष्टपणे मांडण्याचे कौशल्य विकसित करावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
सुमित काकडे यांनी ग्रामीण पार्श्वभूमीतून उच्च शिक्षणापर्यंतचा प्रवास उलगडून सांगत, योग्य दिशा, मेहनत आणि सातत्य असल्यास कोणतेही ध्येय गाठता येते, असा संदेश दिला. स्पर्धा परीक्षेसोबतच सामाजिक जाणीव आणि संशोधनवृत्ती जोपासण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संस्थाध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले होते.त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की विद्यार्थ्यांनी स्वतःची क्षमता ओळखून ध्येय निश्चित करावे.आणि ते पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य महेंद्रकुमार ताकसांडे,प्रा विजय मुप्पीडवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचाचे आयोजन व प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा. प्रशांत खैरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. राजेश बोळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. अनिल मेहरकुरे यांनी केले.या मार्गदर्शन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व व्यक्तिमत्त्व विकासाबाबत नवी प्रेरणा व स्पष्ट दिशा मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. अशोक सातारकर, प्रा. जहिर सय्यद,प्रा दिनकर झाडे, प्रा. सोज्वल ताकसांडे,प्रा. नितीन सुरपाम, प्रा जयश्री ताजने, प्रा शिल्पा कोल्हे, प्रा. प्रवीण डफाडे, करण लोणारे, सीताराम पिंपळशेंडे व विद्यार्थ्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.



