भद्रावतीत दिव्यांग कार्यशाळा उत्साहात संपन्न
तालुक्यातील १२२ दिव्यांगांची सहभागिता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
युथ फॉर जॉब्स व ग्रासरूट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पंचायत समिती भद्रावतीच्या सहकार्याने पंचायत समिती सभागृहात दिव्यांग बांधवांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत भद्रावती व वरोरा तालुक्यातील एकूण १२२ दिव्यांगांनी सहभाग नोंदविला.
कार्यशाळेचे उद्घाटन सहाय्यक गटविकास अधिकारी डॉ. बंडू आकनुरवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानीही तेच होते. प्रमुख अतिथी म्हणून दिव्यांग समन्वयक प्रकाश पिदुरकर, प्रशिक्षक अरविंद भेंडारकर, फेलो प्लेसमेंट अधिकारी जितेंद्र भुरे, दिव्यांग संपर्क कार्यकर्ता महेश मेश्राम व पूजा बुच्चे उपस्थित होते. कार्यक्रम गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. फाऊंडेशनतर्फे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या दिव्यांगांना प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
डॉ. बंडू आकनुरवार यांनी आपल्या मार्गदर्शनात प्रत्येक दिव्यांग व्यक्तीने युडीआयडी (युनिक डिसॅबिलिटी आयडी) कार्ड काढणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच दिव्यांगत्वाचे २१ प्रकार व शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. प्रकाश पिदुरकर यांनी शासन निर्णयांची माहिती देत दिव्यांगांना योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. प्रशिक्षक अरविंद भेंडारकर यांनी फाऊंडेशनमार्फत दिव्यांगांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अरविंद भेंडारकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन महेश मेश्राम यांनी केले.



