संताजी नगरमध्ये प्लॉटवरून दोन गटात हाणामारी
दोन्ही बाजूंच्या तक्रारीवरून १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरातील संताजी नगर परिसरात सोसायटीच्या शिल्लक खुल्या प्लॉटवरून सुरू असलेला वाद शुक्रवारी (दि. १३) विकोपाला जाऊन दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही बाजूंचे काही जण जखमी झाले असून परस्परांच्या तक्रारीवरून एकूण १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संताजी नगर येथील प्लॉट क्रमांक ८०, ८१, ८२, ८३, ८७, ८८ व ८९ हे प्लॉट वादग्रस्त असल्याचे सांगितले जात आहे. संबंधित सोसायटीने या संदर्भात लहाणू बावणे व इतर सात जणांना वकिलामार्फत नोटीस बजावून कोणतेही काम न करण्याची सूचना दिली होती. मात्र शुक्रवारी सकाळी संबंधित सात जण काही इतर लोकांना सोबत घेऊन लोखंडी रॉड, धारदार शस्त्रे व लाठ्या-काठ्या घेऊन प्लॉटवर आल्याचे सांगितले जाते. त्यांनी त्या ठिकाणी भूमिपूजन करण्यास सुरुवात केली.
यावेळी फिर्यादी युगेश खोबरागडे व इतर सोसायटी सदस्यांनी संबंधितांकडे सातबारा उतारा दाखविण्याची मागणी केली. यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद वाढला. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, दुसऱ्या गटातील व्यक्तींनी अश्लील शिवीगाळ करत लाठ्यांनी मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीसह सात ते आठ जण जखमी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीवरून महेश लोणकर, जयश्री लोणकर, सुनिल बावणे, अर्चना बावणे, निखिल बावणे, शुभम नागोसे व ताईबाई लोणकर यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, दुसऱ्या गटातील जयश्री महेश लोणकर यांनी दिलेल्या तक्रारीत संबंधित प्लॉटवर त्यांचा मालकी हक्क असून सातबाऱ्यावर त्यांची नोंद असल्याचा दावा केला आहे. प्लॉट साफसफाई करून पूजा सुरू असताना युगेश खोबरागडे यांनी तेथे येऊन “ही माझी गाडी ठेवण्याची जागा आहे, तुम्ही येथे काय करता?” असे म्हणत वाद घातल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, अश्लील शिवीगाळ करून हाताबुक्यांनी व लाठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या तक्रारीवरून मनोज आस्टूनकर, युगेश खोबरागडे, हरी खोबरागडे, खुशाल मस्के, प्रियाषु मस्के, चिन्नू खोबरागडे, सुनिल डांगे व इम्रान शेख (सर्व रा. संताजी नगर) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या घटनेमुळे संताजी नगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पुढील तपास सुरू आहे.



