ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्मार्ट ग्राम बिबीत ठाम निर्णय : रस्ते पुन्हा फोडू देणार नाही

जलजीवन कंत्राटदाराच्या कामांवर बहिष्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

कोरपना : जिल्ह्यात आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या बिबी ग्रामपंचायतीला केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे गेल्या अडीच वर्षांपासून गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही परिस्थिती शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि प्रशासनाचे कंत्राटदारांवर प्रभावी नियंत्रण नसल्यामुळे निर्माण झाल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे.

जल जीवन मिशनच्या कामादरम्यान गावात ठिकठिकाणी रस्ते खोदून अपूर्ण अवस्थेत सोडण्यात आले आहेत. नाल्यांचे चेंबर फोडले गेले असून त्यांची दुरुस्ती न झाल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य, वाहतूक व दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

महत्त्वाचे म्हणजे ग्रामपंचायत बिबीमध्ये ३५ लाखांची पेव्हर ब्लॉक, रस्ता दुरुस्ती, नवीन ड्रेनेज व रस्त्यांची विकासकामे मंजूर आहेत आणि त्यांची अंदाजपत्रकेही तयार आहेत. मात्र जल जीवन मिशनची कामे अपूर्ण असल्याने ही सर्व विकासकामे अनेक महिन्यांपासून रखडली आहेत. त्यामुळे मंजूर निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर ३० डिसेंबर रोजी झालेल्या ग्रामपंचायत बिबीच्या मासिक सभेत सविस्तर चर्चा झाली. सभेत एकमताने असा ठाम निर्णय घेण्यात आला की, ज्या ठिकाणी ग्रामपंचायत स्तरावर नवीन रस्ते व विकासकामे करण्यात येतील, त्या ठिकाणी पुढे पुन्हा रस्ते फोडण्यास कोणालाही परवानगी दिली जाणार नाही.

ग्रामपंचायत स्वतःच्या स्तरावर रस्त्यांची दुरुस्ती करणार असून, त्यानंतर कोणत्याही योजनेच्या नावाखाली रस्ते फोडण्यास मनाई करण्यात आली आहे.

याचबरोबर जल जीवन मिशनच्या कंत्राटदाराच्या निष्काळजी, संथ व बेफिकीर कामकाजामुळे गावाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सदर कंत्राटदाराने आता गावात प्रवेश करू नये आणि त्यांच्या कामांवर पूर्ण बहिष्कार टाकण्यात येत असल्याचा ठराव ग्रामपंचायतीने मंजूर केला आहे.

ग्रामपंचायतीचे उत्पन्न मर्यादित असल्याने जल जीवन मिशनमुळे झालेल्या रस्ते, नाले व चेंबरच्या नुकसानीची भरपाई करणे शक्य नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या ठरावाची प्रत जल जीवन मिशन विभाग, पंचायत समिती कोरपना, जिल्हा परिषद चंद्रपूर व जिल्हाधिकारी कार्यालय यांना पाठविण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये