ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुख्य निवडणूक निरीक्षकांची भेट

स्ट्राँग रूमची पाहणी व निवडणूक विषयक बाबींचा आढावा

चांदा ब्लास्ट

राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले, मुख्य निवडणूक निरीक्षक विजय सहदेवराव भाकरे व निवडणूक निरीक्षक संजय आसवले यांनी चंद्रपूर महानगरपालिका मतदासंघाला भेट देऊन निवडणूक व्यवस्थेचा आढावा घेतला. याप्रसंगी मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी अकुनुरी नरेश यांनी त्यांना निवडणूक तयारीची माहिती दिली.

   महानगरपालिका क्षेत्रातील निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित आणि नियमानुसार पार पाडण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा झाली. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १ ते ५ यांनी आपल्या विभागाच्या तयारीचा अहवाल सादर केला. यावेळी मतदार केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था, मतदान यंत्रणांची सुरक्षितता, मॉक पोल प्रक्रिया, मतदारांना सोयीसुविधा, निवडणूक प्रचारावर लक्ष ठेवणे, आणि निवडणूक खर्चाची तपासणी आदी मुद्द्यांवर विशेष चर्चा करण्यात आली.

   तसेच निवडणुकीच्या दरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेऊन त्याबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. निवडणूक कार्यात नियमांचे काटेकोर पालन करणे व मतदानाच्या दिवशी योग्य समन्वय साधून सुरक्षित आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करावे, अशा सुचनाही निवडणूक निरीक्षकांनी केल्या. तत्पूर्वी, त्यांनी मनपा झोन क्र. ३ कार्यालयातील स्ट्राँग रुम परिसराची पाहणी केली. मतपत्रिका आणि इतर निवडणूकसामग्रीचे सुरक्षित संचयन होण्यासाठी स्ट्राँग रूमची सुरक्षितता महत्त्वाची आहे, असे निरीक्षकांनी स्पष्ट केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये