वरोरा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा म्हणून अर्चना ठाकरे यांचा पदभार स्वीकार
शहराच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार; नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
राजेंद्र मर्दाने, वरोरा
वरोरा : नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा अर्चना ठाकरे यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला. यानिमित्ताने आयोजित पदग्रहण व सत्कार सोहळा श्री शिवाजी महाराज सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
मंचावर खासदार प्रतिभा धानोरकर, नवनिर्वाचित नगराध्यक्षा अर्चना ठाकरे, माजी नगराध्यक्ष गजानन मेश्राम, विलास टिपले, अहेतेशाम अली,वरोरा न.प. उपमुख्याधिकारी गायकवाड, राष्ट्रवादीचे विलास नेरकर, काँग्रेसचे पदाधिकारी प्रदीप बुराण,आशीष ठाकरे, भाजपा पदाधिकारि बाबा भागडे,नवनिर्वाचित नगरसेवक आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
नगराध्यक्षा अर्चना ठाकरे यांनी आपल्या पहिल्याच भाषणात शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. “नगराध्यक्ष पद हे सन्मानासोबतच मोठी जबाबदारी आहे. नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाचे ऋण फेडण्यासाठी प्रामाणिकपणे काम करेन. मागील चार वर्षांत निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यावर भर देत वरोरा शहर स्वच्छ, सुंदर व विकासाभिमुख करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने काम करणार,” असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “वरोरा नगर परिषद सुमारे १५० वर्षे जुनी असली तरी शहराचा अपेक्षित विकास अद्याप झाला नाही. मतदारांनी काँग्रेस पक्षावर विश्वास टाकून महिला नगराध्यक्षा निवडून दिली आहे. सत्ताधारी-विरोधी असा कोणताही भेद न करता सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन शहराच्या सर्व प्रभागांतील प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील.”
नगराध्यक्ष पदाबाबत बोलताना त्यांनी “हे पद म्हणजे काटेरी मुकुट असून त्यासाठी धैर्याने आणि प्रामाणिकपणे काम करावे लागेल. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस विकास आराखडा तयार केला जाईल,” अशी ग्वाही दिली.
यावेळी माजी नगराध्यक्ष गजानन मेश्राम, विलास टिपले, अहेतेशाम अली, विलास नेरकर, बाबा भागडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमात नवनिर्वाचित नगराध्यक्षा, नगरसेवक व नगरसेविकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याधिकारी गायकवाड यांनी केले. सोहळ्यास काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, नगर परिषदेचे अधिकारी-कर्मचारी तसेच महिला-पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



