ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तब्बल ३१ वर्षांनंतर रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा

चांदा ब्लास्ट

 जिल्हा परिषद हायस्कूल बाखर्डी ता. कोरपना येथील इयत्ता दहावी (शैक्षणिक वर्ष १९९६–९७) च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा अत्यंत उत्साहात व थाटामाटात नुकताच पार पडला. तब्बल ३१ वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणी व गुरुजनांच्या भेटीमुळे वातावरण भावनिक आणि आनंदमय झाले होते.

कार्यक्रमाला रामटेके सर व रामटेके मॅडम, चिने सर, गेडाम सर, गुरनुले सर, चव्हाण सर, दुर्गे सर तसेच मुख्याध्यापिका कोटेवार मॅडम उपस्थित होत्या. यावेळी श्रीमती शेवंताबाई मत्ते, ऍड. राजेंद्र जेनेकर (मुख्य प्रचारक, अखिल भारतीय गुरुदेव सेवामंडळ, महाराष्ट्र राज्य) तसेच धुर्वे सर (सहाय्यक शिक्षक, महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर) यांचीही उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या जुन्या वर्गखोलीत बसून परिचय सत्राने केली. त्यानंतर शाळेच्या प्रांगणात सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत ऍड. सारिका हिरादेवे, ज्योती गेडाम व शालिनी बोंडे यांनी स्वागतगीताने केले. सर्व माजी शिक्षकांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान दुर्गे सर यांनी सादर केलेल्या गीताने उपस्थितांची मने जिंकली. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शाळेतील आठवणींना उजाळा दिला. ३० वर्षांनंतर गुरुजनांना भेटण्याचा विद्यार्थ्यांचा आनंद आणि आपल्या विद्यार्थ्यांना पुन्हा पाहण्याचा शिक्षकांचा आनंद स्पष्टपणे जाणवत होता. या स्नेहमेळाव्यामुळे गुरु-शिष्य नात्यातील आपुलकी अधिक दृढ झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

यावेळी माजी शिक्षकांसह उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हंसराज कातकर यांनी तर प्रास्ताविक संजय धोटे यांनी केले. ॲड. राजेंद्र जेनेकर व ॲड. सारिका हिरादेवे-जेनेकर यांनी उपस्थित मान्यवरांना ‘ग्रामगीता’ भेट देत गुरुदेव सेवामंडळाच्या कार्याची माहिती दिली तसेच शाळेसाठी आर्थिक मदत सुपूर्द केली. धुर्वे सर यांनीही शाळेला आर्थिक सहाय्य केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अशोक पोतराजे निमणी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अशोक पोतराजे निमणी, बंडू बुचुंडे व गितेश्वर टिपले यांनी विशेष मेहनत घेतली. भोजनासह सर्व व्यवस्था उत्कृष्टरीत्या पार पडल्याबद्दल आयोजकांचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. एकंदरीत, आठवणींना उजाळा देणारा, भावनांनी ओथंबलेला आणि आनंददायी असा हा स्नेहमिलन सोहळा उत्साहात संपन्न झाला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये