तालुक्यातील भिवकुंड रेती घाटांवर अवैध उत्खनन : तात्काळ कारवाईची मागणी
नगरसेवक अतुल वाकडे यांचा प्रशासनाला इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभुर्णा तालुका रेती उत्खनन व वाहतूकीसाठी तसाही प्रसिध्दच आहे. तालुक्यातील पाच-सहा घाट लिलावात गेले आहेत. त्यापैकी थेरगाव रेतीघाट सुध्दा लिलावात गेला आहे. मात्र थेरगाव घाटाच्या काहीच अंतरावर भिवकुंड परिसरात शासनाची कोणतीही अधिकृत परवानगी नसताना अवैधरीत्या रेती घाट तयार करून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रेती उत्खनन व वाहतूक सुरू असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक अतुल विश्वनाथ वाकडे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
या अवैध रेती उत्खननामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून नदीपात्र, पर्यावरण व जलस्रोतांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच अवजड वाहनांच्या बेछूट वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरावस्था झाली असून स्थानिक नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे,असेही त्यांनी नमूद केले. तालुका मुख्यालयापासून केवळ ३ किमी अंतरावर हा गोरखधंदा राजरोसपणे सुरू असतांना महसूल प्रशासनाला याची माहिती नसावी, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून या अवैध रेती उत्खननावर कायम बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
या संदर्भात प्रशासनाकडे वारंवार तक्रारी व निवेदने सादर करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने रेती माफियांचे मनोबल वाढले आहे. परिणामी, परिसरातील सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे पोंभुर्णा तालुक्यातील सर्व अवैध रेती घाट तात्काळ बंद करून संबंधित दोषी व्यक्ती व रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी नगरसेवक अतुल वाकडे यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जर प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही नगरसेवक अतुल वाकडे यांनी प्रशासनाला दिला आहे


