राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त प्रा. अश्विनी जाधव यांचा शेतकरी सन्मानाने गौरव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या निमित्ताने तरुण महिला शेतकरी तसेच कृषी शिक्षणाला प्राधान्य देत त्यांना शेतीच्या मुख्य प्रवाहात सक्रियपणे सहभागी करून घेण्याच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत प्रा. अश्विनी विनायक जाधव (जैवतंत्रज्ञान), कृषी वनस्पतीशास्त्र विभाग, समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा यांचा शेतकरी सन्मान देऊन गौरव करण्यात आला.
हा सन्मान डॉ. अर्चना काकडे तसेच मा. ए. पी. सिंग, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र (के. व्ही. के.), दुर्गापूर, अमरावती यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ, प्राध्यापक, शेतकरी व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. अश्विनी जाधव यांनी महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी जैवतंत्रज्ञान, आधुनिक शेती पद्धती, शाश्वत शेती, मूल्यवर्धन, कृषी उद्योजकता (Agripreneurship) याविषयी सातत्याने मार्गदर्शन व प्रशिक्षण देत मोलाचे योगदान दिले आहे. ग्रामीण भागातील तरुण महिलांना शेतीकडे आकर्षित करून त्यांना आत्मनिर्भर बनविण्याच्या त्यांच्या कार्याची या प्रसंगी विशेष प्रशंसा करण्यात आली.
सन्मान स्वीकारताना प्रा. जाधव यांनी सांगितले की, “हा सन्मान माझ्यासाठी केवळ गौरव नसून अधिक जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. तरुण महिला शेतकऱ्यांना सक्षम करून शाश्वत शेतीच्या दिशेने कार्य करणे हीच खरी राष्ट्रसेवा आहे.”
या सन्मानाबद्दल त्यांनी माननीय मार्गदर्शक, सहकारी व संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले.
हा गौरव भविष्यात अधिक निष्ठेने व नव्या ऊर्जा-स्फूर्तीने महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करण्यास प्रेरणादायी ठरणार आहे.



