ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घुस नगरपरिषद निवडणूक 2025 वर गंभीर आरोप

निष्ठा विरुद्ध गद्दारीचे राजकारण उघड

चांदा ब्लास्ट

घुग्घुस, चंद्रपूर । घुग्घुस नगरपरिषदेच्या अलीकडेच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणूक 2025 संदर्भात गंभीर आरोप समोर आले आहेत. घुग्घुस ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुधाकर गणपत बांदुरकर यांच्या मते, जनतेने या निवडणुकीत आपला कौल स्पष्ट दिला असला तरी निवडणूक प्रक्रियेदरम्यान लोकशाहीला कलंक लावणाऱ्या अनेक चिंताजनक घटना घडल्या आहेत.

बांदुरकर यांनी आरोप केला की या निवडणुकीत लपवाछपवीचे राजकीय साटेलोटे आणि गुप्त समझोत्यांमुळे अनेक प्रामाणिक व पक्षनिष्ठ उमेदवारांवर मोठा अन्याय झाला. बहुतांश विजयी उमेदवारांनी आपल्या पक्षाशी निष्ठा राखण्याऐवजी विरोधी पक्षातील उमेदवारांशी गुप्त हातमिळवणी केली. या साटेलोट्याचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या पक्षातील लोकप्रिय व प्रामाणिक उमेदवारांचा पराभव करणे आणि विरोधी गटातील काही निवडक उमेदवारांना विजयी करणे हा होता.

ते पुढे म्हणाले की, या लपलेल्या राजकीय खेळी केवळ स्थानिक पातळीपुरत्याच मर्यादित नव्हत्या, तर राष्ट्रीय स्तरावरील पक्षांपर्यंत योजनाबद्ध पद्धतीने राबवण्यात आल्या. मतांचे जाणीवपूर्वक विभाजन, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करणे आणि पक्षातील वैचारिक विरोधकांना कमकुवत करण्याची संपूर्ण यंत्रणा या निवडणुकीत सक्रिय होती.

सुधाकर बांदुरकर यांच्या मते, या कटकारस्थानाचा सर्वाधिक फटका स्वाभिमानी विचारसरणीने प्रामाणिकपणे काम करणाऱ्या उमेदवारांना बसला. अनेक ठिकाणी असे उमेदवार अत्यल्प मतांनी पराभूत झाले. ही पराजय जनतेच्या विश्वासाची नसून पक्षांतर्गत गद्दारीचा परिणाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे, पक्षाशी विश्वासघात करून विरोधी पक्षांशी संगनमत करणारे काही उमेदवार जरी निवडून आले असले, तरी ते ना स्वतःच्या अंतःकरणात आणि ना जनतेच्या नजरेत खरे विजेते आहेत. सत्तेच्या लालसेपोटी केलेली गद्दारी ही कायमची कलंकरेषा ठरते आणि ती कालांतराने जनतेसमोर उघडी पडते.

बांदुरकर यांनी सांगितले की घुग्घुसची जनता जागरूक आणि सुज्ञ आहे. ती सत्य आणि असत्य यामधील फरक ओळखते. आज जी गद्दारी दिसत नाही, ती उद्या जनतेच्या न्यायालयात नक्कीच उघड होईल. लोकशाहीत सत्ता येत-जात असते; मात्र प्रामाणिकपणा, निष्ठा आणि स्वाभिमान हीच खरी राजकीय संपत्ती असते.

अखेर ते म्हणाले की, ही निवडणूक केवळ निकालांची लढाई नव्हती, तर निष्ठा आणि गद्दारी यांच्यातील संघर्ष होता. जनतेची फसवणूक करून कटकारस्थानातून मिळवलेला विजय क्षणिक असतो, तर सत्य सदैव टिकून राहते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये