कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन लि.(KPCL) तात्काळ बंद करा… ग्रामस्थ आक्रमक
पर्यावरणविषयक लोकसूनावनीत सुनावले खडे बोल : ग्रामस्थांचा उफाळला असंतोष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळ, प्रादेशिक कार्यालय चंद्रपूर यांच्या उपस्थितीत दिनांक ३० रोजी दुपारी ११.०० वाजेपासून प्रकल्पग्रस्तांच्या प्रचंड विरोधात मे. कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड. शक्ती भवन नं.८२ रेस कोर्स रोड, बेंगळूर अर्बन कर्नाटका या कंपनीच्या ओपन कास्ट मायनिंग प्रकल्प गाव सोमनाळा, बोंथाळा, बरांज मोकासा चेक बरांज, केसुर्लि, चिचोर्डी, तालुका. भद्रावती जिल्हा. चंद्रपूर मायनिंग लिज एरिया.१४५७.२० हा विस्तारित क्षमता ३.५० MTPA ते ५.०० MTPA या प्रकल्पाच्या प्रस्तावाबाबत पर्यावरणविषयक लोकसूनावाणी घेण्यात आली.
अतिशय तणावपूर्ण व तीव्र असंतोषाच्या वातावरणात पार पडलेल्या या सुनावणीत ग्रामस्थानी व उपस्थित लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे, काँग्रेस नेते सुनील नामोजवार, तसेच कोंढा तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष भाजपाचे आकाश वानखेडे या लोकप्रतिनिधीनी सदर कंपनीच्या अधिकाऱ्यांचा खरपूस समाचार घेत परिसरातील समस्याना वाचा फोडली.
परिसरातील ब्लास्टिंग, अवजड वाहतूक, जीवघेणे प्रदूषण व मुख्य म्हणजे पीडित गावाचे पुनर्वसन व आयुध निर्माणि लगत संरक्षण भिंत आदी करण्यात येणार नाही तोपर्यंत जनसुनावणी अथवा कंपनीचे काम करू नये. तसेच स्थानिक दलालांना हाताशी धरून मनमानी वृत्तीचा विरोध करीत व लाखो रुपयाचा अपहार केल्याचा आरोप करीत कोंढा ग्रामपंचायतचे तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष भाजपाचे नेते आकाश वानखेडे यांनी कंपनीचे अधिकारी, जिभकाटे व आर. पी. सिंग यांचेवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. तसेच काँग्रेस नेते ॲड. सुनील नामोजवार यांनी प्रकल्पग्रस्त व पीडित कुटुंबाची बाजू आक्रमकपणे मांडून जमिनीबाबतचा निस्तार हक्क अबाधित असून जोपर्यंत गावांचे पुनर्वसन होणार नाही तोपर्यंत जनसुनावणी अथवा कंपनीच्या विस्तारीकरणास तीव्र विरोध केला. याउपर कार्यवाही न झाल्यास काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असे बजावले.
शिवसेना शिंदे गटाचे आक्रमक नेते लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांनी सुद्धा प्रदूषण, पुनर्वसन, अवजड वाहतुकीवर लगाम, पीडित प्रकल्पग्रस्तांच्या अधिग्रहित जमिनीचा उचित प्रलंबित मोबदला प्रशासन व दस्तुरखुद्द KPCL कंपनी लेखी आश्वासन देणार नाही तोपर्यंत कंपनीचे काम सुरू करू नये असे ठणकावले. व २० नोव्हेंबर रोजीच्या जिल्हाधिकारी आदेशाची पायमल्ली करणाऱ्या अधिकाऱ्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली.
स्थानिक ग्रामस्थ्य व लोकप्रतिनिधींचा तीव्र आक्रमक पवित्रा पाहता आजच्या जनसुनावणीचे ठोस निर्णयाअभावी सूप वाजले.
आजच्या पर्यावरणविषयक लोकसूनावणी करिता परिसरातील स्त्री पुरुष आबालवृद्ध,ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कंपनीच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसह स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक योगेश पारधी यांचे नेतृत्वात मोठा व चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.



