घरकुल रेती पुरवठ्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नऊ रेती घाटांचे उद्घाटन
घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती उपलब्ध करून देण्याचा शासनाचा हेतू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभुर्णा : तालुक्यात मोफत घरकुल रेती पुरवठ्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नऊ रेती घाटांचे उद्घाटन यापूर्वीच महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते तथा मा. विधानसभा सदस्य श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते संपन्न झालेले आहे. सदर उपक्रमाच्या माध्यमातून घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती उपलब्ध करून देण्याचा शासनाचा हेतू आहे.
या अनुषंगाने तालुक्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक बुधवार हा दिवस घरकुल यादीसाठी राखीव ठेवण्यात आलेला असून, बुधवारी घरकुल लाभार्थ्यांना रेतीचे वितरण करण्यात येणार आहे.
घरकुल लाभार्थ्यांसाठी खालील रेती घाट राखीव करण्यात आलेले आहेत : चक बामणी, टोक, आष्टा, मोहाळा, चक बल्लारपूर–एक, चक बल्लारपूर–दोन, जुनगाव, जामतुकुम रे. इत्यादी.
सदर रेती घाटांवर महसूल यंत्रणा तसेच संबंधित पोलीस पाटील हे उपस्थित राहणार आहेत, जेणेकरून रेती वितरणाची कार्यवाही सुरळीत व पारदर्शकपणे पार पडेल.
घरकुल रेतीसाठी आवश्यक असलेले मोफत (झिरो रॉयल्टी) पासेस यापूर्वीच वितरित करण्यात आलेले आहेत. तसेच नव्याने मंजूर करण्यात आलेल्या घरकुल लाभार्थ्यांनी त्यांचे रॉयल्टी पासेस ग्रामसेवक व रोजगार सेवक यांच्याकडून प्राप्त करून घ्यावेत.
रेती वाहतूक पूर्ण झाल्यानंतर संबंधित झिरो रॉयल्टी पासेस रोजगार सेवक यांच्याकडे जमा करणे सर्व घरकुल लाभार्थ्यांना बंधनकारक राहील, याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी.
सदर उपक्रमाचा लाभ पात्र घरकुल लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन तहसील प्रशासन पोंभुर्णा यांच्या वतीने करण्यात येत आहे.



