समर्थ कृषी महाविद्यालयात ‘वीर बाल दिवस’ उत्साहात साजरा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा : डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला अंतर्गत समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा येथील राष्ट्रीय सेवा योजना (रा.से.यो.) युनिटच्या वतीने ‘वीर बाल दिवस’ निमित्त सिनगाव जहागीर येथील जनता माध्यमिक शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमास जनता माध्यमिक शाळेचे प्राचार्य प्रा. लांबे व प्रा. मेहेत्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शौर्य व त्यागाची भावना निर्माण व्हावी यासाठी निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, वीर बाल जनजागृती फेरी तसेच कथाकथन स्पर्धा घेण्यात आल्या. हे सर्व उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे व उपप्राचार्य प्रा. देवानंद नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.दरवर्षी २६ डिसेंबर रोजी साजरा होणारा ‘वीर बाल दिवस’ हा गुरु गोविंद सिंगजी यांचे सुपुत्र साहिबजादा जोरावर सिंगजी व साहिबजादा फतेह सिंगजी यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. या प्रसंगी रा.से.यो. अधिकारी प्रा. योगेश चगदळे यांनी कथांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शौर्य, त्याग व बलिदानाचे महत्त्व प्रभावीपणे समजावून सांगितले.कार्यक्रमात बोलताना प्राचार्य प्रा. लांबे यांनी, “देशाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया घडविण्यासाठी अशा वीर बाल दिवसासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती व मूल्याधिष्ठित विचार रुजतात,” असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमात शौर्य, सहनशीलता व निःस्वार्थ सेवेच्या कथांवर प्रकाश टाकण्यात आला असून, त्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. सचिन सोळंकी व प्रा. अरुण शेळके यांनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाप्रसंगी 350 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची उपस्थिती ही उल्लेखनीय बाब होती.



