तिरुपती पोले यांची राष्ट्रीय रोड वाहतूक सुरक्षा टीमच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- समाजहितासाठी सातत्याने कार्यरत असलेले व जनसामान्यांमध्ये विश्वासार्ह नाव म्हणून ओळखले जाणारे तिरुपती पोले यांची राष्ट्रीय रोड वाहतूक पर्यावरण नागरी सुरक्षा टीम (National Road Vahtuk Paryavaran Nagari Suraksha Team) च्या चंद्रपूर जिल्हा राष्ट्रीय रोड वाहतूक सुरक्षा जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अस्लम हुसेन शेख यांच्या हस्ते जाहीर करण्यात आली.
रस्ते अपघात रोखणे, वाहतूक सुरक्षेबाबत जनजागृती करणे, पर्यावरण संरक्षण, नागरी सुरक्षेसह समाजातील दुर्बल घटकांच्या समस्या लोकशाही मार्गाने सोडवणे ही महत्त्वाची जबाबदारी तिरुपती पोले यांच्यावर सोपवण्यात आली आहे. राष्ट्रीय पोलीस संरक्षण पथकाच्या माध्यमातून संघटनेची विचारसरणी प्रभावीपणे राबवून नागरिकांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी ते सक्रिय भूमिका बजावतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
संघटनेच्या नियमांचे काटेकोर पालन करून, कायदे व भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून, शाश्वत विकास आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी कार्य करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.



