जिल्हास्तरीय स्पर्धेत धोंडाअर्जुनी येथील विद्यार्थिनींची घवघवीत कामगिरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- खेमाजी नाईक कला व विज्ञान महाविद्यालय, गडचांदूर येथे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, चंद्रपूर यांच्या वतीने आयोजित आश्रम शाळा विद्यार्थ्यांचा तीन दिवसीय सांस्कृतिक कला व क्रीडा महोत्सव – २०२५ मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. या महोत्सवात जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांनी कला, संस्कृती व क्रीडा क्षेत्रात आपले गुणवैशिष्ट्य प्रभावीपणे सादर केले.
या महोत्सवात स्व. सदाशिव पाटील चटप आश्रम शाळा, धोंडाअर्जुनी येथील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत (माध्यमिक गट) त्यांनी उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला. त्याचबरोबर खो-खो स्पर्धेत (प्राथमिक गट) देखील त्यांनी दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवून दुहेरी यशाची नोंद केली.
विद्यार्थिनींच्या या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक एस. एम. राठोड तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी दिलेले योग्य मार्गदर्शन, नियमित सराव व शिस्तबद्ध प्रशिक्षण महत्त्वाचे ठरले. या घवघवीत यशामुळे शाळेचे नाव जिल्हास्तरावर उज्वल झाले असून विद्यार्थिनींचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.



