डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकरला आग
ब्रम्हपुरी नागभीड मार्गावरील घटना
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी:- ब्रह्मपुरी नागभीड राज्य महामार्गावर डिझेल वाहतूक करणाऱ्या टँकरने भररस्त्यावर अचानक पेट घेतल्याची घटना गुरुवारला सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान घडली. टँकरने पेट घेतल्यामुळे आगीची लोळ आकाशात पसरले होते. प्राप्त माहितीनुसार, ब्रह्मपुरी येथील साई पेट्रोलियम देलनवाडी यांच्या मालकीचा एम. एच. ३४ बी. जी. ७९७९ टँकर हा ब्रम्हपुरी नागभीड या राज्य महामार्गावरील खडककर कन्स्ट्रक्शन कंपनी येथे डिझेल पुरवठा करण्यासाठी गेला होता.
आज दिनांक २५ डिसेंबर २०२५ सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान ब्रह्मपुरी नागभीड राज्य महामार्गावरील खडतकर कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अगदी गेट समोर डिझेलचा टँकरने अचानक पेट घेतला. टँकरला आग लागल्याचे समजताच टँकर चालकाने प्रसंवधान राखत टँकर राज्य महामार्गाच्या कडेला उतरविला व स्वतः बाहेर पडून स्वतःचा जीव वाचविला. टँकरने पेट घेतल्यामुळे आगीची लोळ आकाशात पसरले होते. घटनेची माहिती मिळताच ब्रह्मपुरी नगरपालिकेचे अग्निशमन वाहनासह दलाचे कर्मचारी मुकेश राऊत, आशिष मालोडे, पवन दिवटे यांनी घटनास्थळ गाठत आग आटोक्यात आणली. घटनेची माहिती मिळताच ब्रह्मपुरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
श्री. साई पेट्रोलियम देलनवाडी यांच्या मालकीच्या डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकरमध्ये अंदाजे सहा हजार लिटर डिझेल असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकरने पेट घेतल्यामुळे श्री. साई पेट्रोलियम देलनवाडी यांचे निव्वळ टँकरचे ६० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे कळते.



