गडचिरोली जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे अधिवेशन उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे अधिवेशन नुकतेच शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहात साजरे करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि ग्रंथालय शास्त्राचे जनक सी. रंगराजन यांचे प्रतिमेचे पूजन करून अधिवेशनाची सुरुवात करण्यात आली. अध्यक्षस्थानी दिलीपराव म्हस्के माजी न्यायाधीश यांनी भूषविले तर उद्घाटन संकल्प फाउंडेशन चे संस्थापक डॉ. पंकज नरुले यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे, नागपूर विभाग ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह प्राचार्य भाऊराव पत्रे, जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे अध्यक्ष जगदीश म्हस्के, सचिव रवींद्र समर्थ,कोषाध्यक्ष अरुण मुनघाटे हे मान्यवर उपस्थित होते.
मानवी जीवनात ग्रंथाचे महत्व मोठे असून आजवर गावोगावी वाचकांपर्यंत उत्तमोत्तम ग्रंथ उपलब्ध करून देण्याचे काम ग्रंथालय सेवकांनी मोठ्या निष्ठेने केले आहे. यापुढेही उत्तम समाज निर्मितीसाठी ग्रंथ वाचकांची चळवळ अधिक गतिमान व्हावी, असे प्रतिपादन बंडोपंत बोढेकर यांनी केले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी ग्रंथ वाचनाचे महत्त्व विषद केले. मानवी जीवनाला व मुक्या प्राण्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक असणाऱ्या रानभाज्या, कंदमुळे,वनस्पती यावर “रानभाज्याच्या जगात ” हे पुस्तक लिहिणाऱ्या शेतकरी सौ. संगीता ठलाल यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच मातृरक्षा या मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. दुसऱ्या सत्रात आजच्या वाचकांचे दृष्टीने ग्रंथालयाच्या अद्यावतीकरणाची गरज या विषयावर जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे यांनी ग्रंथालयाचे संगणीकरण, विविध डिजिटल एप चा उपयोग, ए- आय चा उपयोग, ई- बुक, डिजिटल वाचनालय ही आजची गरज असल्याचे मत विषद केले . तर प्रा. संध्याताई येलेकर यांनी कपाटातील ग्रंथाची स्थिती यावर भाष्य केले.
शेवटच्या सत्रात झालेल्या खुल्या अधिवेशनात ग्रंथालयांची प्रलंबित असणारी ४०% वाढ शासनाने मंजूर करून अदा करावी, सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी व सेवाशर्ती देण्यात यावी , नवीन ग्रंथालयांना शासन मान्यता व वर्गबदल देणे सुरु करावे, ग्रामीण भागातील १ ते १० पटसंख्या असणाऱ्या प्राथमिक शाळा शासनाने बंद करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित करू नये यासारखे महत्त्वाचे ठराव सर्वानुमते पारित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशवन कावंडर यांनी केले.
हे अधिवेशन यशस्वी करण्याकरिता अध्यक्ष जगदीश म्हस्के, ग्रंथमित्र भाऊराव पत्रे, सचिव रवींद्र समर्थ, अरुण मुनघाटे, अशोक चलाख, मुकुंद म्हशाखेत्री, संतोष मशाखेत्री, प्रभाकर पाल, विकास पाल,अजय जक्कुलवार,हरिराम मातेरे, प्रमोद शेंडे, अविनाश निकोडे, दिलीप म्हशाखेत्री, डोमाजी मुनघाटे, देवराव चौधरी, स्वप्नील पीपरे, रविसागर चुधरी, देवेंद्र ब्राम्हणवाडे,अनंत झंजाड,कु. प्रियंका म्हस्के, कु सुप्रिया धोडरे, कु. कांचन आत्राम आदींनी मोलाचे सहकार्य केले.



