आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून चिंतलधाबाची सर्वांगीण विकासाच्या दिशेने मोठी झेप!
६१.१९ लाखांच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन, आरोग्यसेवा बळकट होणार

चांदा ब्लास्ट
आ.मुनगंटीवार यांच्या हस्ते कार्पेट निर्मिती व प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन, रोजगाराचे दालन खुले होणार
आ. मुनगंटीवार यांच्यामुळे सौरऊर्जा व ग्रामीण सुविधा उभारणीला नवी गती
चंद्रपूर :_ राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे चिंतलधाबा गावाने सर्वांगीण विकासाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. गावाच्या आरोग्यसेवा बळकटीकरणाच्या दृष्टीने दि. ५ डिसेंबर रोजी चिंतलधाबा येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. तसेच, कार्पेट निर्मिती व प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटनही आ.मुनगंटीवार यांनी केले असून, या उपक्रमामुळे स्थानिक महिलांसाठी रोजगाराची नवी दालने खुली झाली आहेत.
यावेळी, प्रदेश महामंत्री अल्काताई आत्राम, भाजपा तालुकाध्यक्ष हरिभाऊ ढवस, सरपंच सौ. शुभांगी कुत्तरमारे, उपसरपंच रोशन ठेंगणे, विनोद देशमुख, राहुल पाल, रवि मरपल्लीवार, अजय मस्के, माविमचे जिल्हा समन्वयक प्रदीप काथोडे, दशरथ फरकडे आदींची उपस्थिती होती.
आरोग्य उपकेंद्रासाठी तब्बल ६१.१९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामुळे गावातील नागरिकांना आवश्यक आरोग्यसेवा आपल्या परिसरातच मिळणार आहेत.
गावाच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील असलेल्या सरपंच व उपसरपंच यांच्या मागण्यांना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे ठोस बळ मिळाले आहे. चिंतलधाबाच्या विकासासाठी त्यांच्या या प्रयत्नांना आता वेग आणि दिशा मिळत असून गाव सर्वांगीण प्रगतीकडे वाटचाल करत आहे.
नागरिकांनी मांडलेल्या दोन प्रमुख मागण्यांचाही विचार करण्यात आला. यामध्ये स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णयही तत्काळ घेण्यात आला आहे. बांधकाम विभागाला अंदाजपत्रक तयार करण्याचे आ.सुधीर मुनगंटीवार यांनी निर्देश दिले. चिंतलधाबाची विजेची समस्या सोडविण्यासाठी महावितरणसोबत सविस्तर बैठक घेण्यात येणार आहे. यापूर्वी उथळपेठ हे गाव १००% सोलार करण्यात आले होते; त्याच धर्तीवर चिंतलधाबा हे महाराष्ट्रातील दुसरे पूर्ण सौरऊर्जेवर चालणारे गाव करण्याचा मानस आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. त्यादृष्टीने आगामी वर्षभरात या सोलार प्रकल्पाबद्दल गतीने काम करण्याचे निर्देशही देण्यात आले.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशांमुळे चिंतलधाबा गावाच्या विकासाला नवे बळ मिळणार असून आरोग्य, ऊर्जा आणि मूलभूत सुविधांच्या उन्नतीला निर्णायक दिशा मिळेल. आगामी काळातही नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्याने आणि जबाबदारीने कार्यरत राहू, असा ठाम विश्वास कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला.
कार्पेट निर्मिती व प्रशिक्षण केंद्र
चिंतलधाबा येथे महिला आर्थिक विकास महामंडळ आणि लोकर संशोधन संघ, मुंबई यांच्या संयुक्त उपक्रमातून स्वयं सहायता महिला बचत गटाच्या कार्पेट निर्मिती व प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.कार्पेट निर्मितीचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर येथील तरुणी व महिला यांच्या प्रशिक्षण कौशल्याचा भविष्यात विचार व्हावा, त्यांना स्थिर उत्पन्न मिळावे यासाठी येत्या सहा महिन्यात त्यांना मानधन देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.यासाठी प्रशिक्षणार्थी तरुणी व महिलांची यादी तयार करावी.
कायम सक्षम आरोग्य सुविधेचा मानस
आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांना अधिक बळ देताना आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी अलीकडेच कळमना येथे २ कोटी ६८ लाखांचे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उमरी पोतदार येथे ८ कोटी ७५ लाखांच्या प्राथमिक आरोग्य संकुलाचे लोकार्पण केले आहे. अर्थमंत्री असताना शिर्डी साईबाबा संस्थानमार्फत ७.५ कोटींचे एमआरआय मशीन, १.५ कोटींची मोबाईल कॅन्सर व्हॅन उपलब्ध करून देऊन जिल्ह्यातील आरोग्यसेवेला नवी दिशा देण्यात आली. तसेच १३ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे, ३२ स्मार्ट आरोग्य केंद्रे, ६ स्मार्ट रुग्णालये, मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल यांसारख्या भव्य प्रकल्पांमुळे चंद्रपूर जिल्ह्यात सक्षम आणि आधुनिक आरोग्यव्यवस्था उभी करण्याचा मोठा उपक्रम त्यांनी साध्य केला.



