ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षकांचा अभिनव उपक्रम

पोलीस आणि नागरिकांमधील संवाद वाढवण्यासाठी 'संवाद उपक्रम' सुरू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यात विश्वास, सहकार्य आणि समन्वय अधिक दृढ करण्यासाठी वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल (भा.पो.से.) यांनी संपूर्ण जिल्ह्यात संवाद उपक्रम प्रभावीपणे सुरू केला आहे. लोकाभिमुख पोलीस प्रशासनाच्या दृष्टीने उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल असून याद्वारे गुन्हेगारी नियंत्रण आणि शांतता सुव्यवस्था राखण्यास मोठी मदत होणार आहे. या उपक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि उद्दिष्ट्ये जनतेचा पोलिस प्रशासनाशी थेट संवाद साधून सुरक्षा विषयक अडचणी बाबत माहिती देणे व पोलिसांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे उपाययोजना करणे असे आहे.

या उपक्रमांतर्गत पोलीस ठाणे स्तरावर दरमहा विविध व्यावसायिक, संस्था आणि नागरिकांसोबत बैठका घेतल्या जातील. यामुळे नागरिकांना आपल्या समस्या थेट पोलिसांसमोर मांडता येतील. सराफा व्यावसायिक, बैंक अधिकारी, हॉटेल चालक आणि खाजगी कंपन्यांचे व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करून सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, सुरक्षा रक्षक तैनात करणे आणि सुरक्षिततेच्या इतर उपाययोजनांबाबत चर्चा केली जाईल. शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्य आणि शिक्षकांशी तसेच खाजगी क्लासेस चे शिक्षक यांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधून विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करणे आणि त्यांना आपल्या तक्रारी निर्भयपणे मांडता येण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे. सर्व धर्मीय संस्थांच्या विश्वस्तांसोबत तसेच धार्मिक कार्यक्रमाचे नेहमी आयोजन करणारे, धार्मिक संघटनांचे पदाधिकारी यांच्या बैठका घेऊन जातीय सलोखा राखणे आणि एकमेकांच्या सण-उत्सव, प्रथा, परंपरांचा आदर राखून शांतता राखण्यावर भर दिला जाणार आहे. ग्रामीण भागात ठाणेदार स्वतः प्रत्येक महिन्यात किमान ४ गावांमध्ये ‘संवाद’ बैठकांचे आयोजन करतील. यामध्ये ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांच्यासह युवक-युवतींचा सहभाग घेतला जाईल. सायबर पोलिस स्टेशन, डायल ११२, महिला सुरक्षा, नवीन कायदे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यांसारख्या विषयांची माहिती नागरिकांपर्यन्त पोहचविण्यात येईल.

त्यामुळे नागरिकांना ठाणेदार व इतर अधिकाऱ्यांसमक्ष गावात त्यांच्या समस्या मांडता येतील. तसेच काही ठिकाणी स्वतः पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी “संवाद” उपक्रमांतर्गत गावभेटी देवून नगरिकांसोबत संवाद साधणार असून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणार आहेत.

सदर उपक्रमांतर्गत स्थानिक पातळी वरील समस्या जाणून घेणे व त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी स्थानिक पातळीवर काम करणारे इतर प्रशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहभागी करण्याचा मानस असल्याने पोलिस अधिक्षकांनी सांगितले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये